नाशिक – नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरातचा एकेकाळी अतिशय निकटचा साथीदारा असणाऱ्या सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचा अध्यक्ष नामकर्ण आवारे याला खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर एक ना एक दिवस अटक होईल, असे सिन्नर तालुक्यातील अनेकांना वाटत होते. त्याप्रमाणे सिन्नर पोलिसांनी बुधवारी आवारे यास अटक केल्यानंतर हे तर होणारच होते, अशी प्रतिक्रिया उमटली. आवारेची अटक टाळण्यासाठी तो ज्याचा ‘सिद्धपुरुष’ आणि ‘ब्रम्हांडनायक’ असे वर्णन करीत होता, तो अशोक खरातही येऊ शकला नाही.

कारण, तोच काही दिवसांपासून न्यायालय, पोलीस ठाणे, कारागृह अशा फेऱ्या मारुन गर्भगळीत झाला आहे. नामकर्ण आवारे हा अशोक खरातच्या जवळच्या वर्तुळातील एक मानला जातो. तो मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थांनचा खजिनदारही होता. मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिराची उभारणी होईपर्यंत आणि त्यानंतरची अनेक वर्ष आवारे हा खरातबरोबर होता. मंदिर परिसरातील अनेक धार्मिक सोहळ्यांच्या आयोजनात आवारेचा पुढाकार असायचा.

खरातच्या नावाचा डंका वाजू लागल्यल्र मंदिरात अनेक महत्वाच्या व्यक्ती येऊ लागल्या. त्यांच्या स्वागतासाठी बऱ्याच वेळा आवारे हजर असायचा. मंदिरात येणार्‍या मंत्र्यांना सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या कार्यालयात आणून त्यांचा सत्कारही तो करीत असे. आवारे संस्थापक असलेल्या कुंदेवाडी येथील जगदंबा ग्रामीण पतसंस्थेवर आवारेने खरातला संचालक म्हणून घेतले होते. नंतर खरातला पतसंस्थेचे अध्यक्षही केले होते.
खरातने जगदंबा ग्रामीण पतसंस्थेत ३२ बेनामी खाती उघडून त्यावर दोन ते अडीच कोटींची उलाढाल केल्याची चर्चा होती.

त्या ३२ खातेदारांपैकी एकाने सिन्नर पोलीस ठाण्यात खरात याच्यासह व्यवस्थापक व संचालक मंडळाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांना अटकही केली होती. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आवारे आणि खरात यांचे एकत्र असलेले फोटो दाखवून खरातबरोबर आवारेवरही आरोप केले होते. २०२४ मध्ये खरात आणि आवारे यांचे बिनसले.

त्यामुळे आवारे श्री ईशान्येश्वर मंदिराकडे फिरकेनासा झाला होता. श्री शिवनिका संस्थांनवरील आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता.
खरातला ‘सिद्धपुरुष’ मानणाऱ्या आवारेचे २०१२ मध्ये ‘असा मी नामकर्ण’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. या पुस्तकात पान नंबर १८२ ते १९४ या १३ पानांमध्ये ‘सिद्धपुरुषांच्या सहवासात’ या शीर्षकाखाली अशोक खरातचे गुणगान केले आहे. पुस्तकात आवारेने खरातची भेट झाल्यापासून ते त्याच्या तथाकथित ‘चमत्कारांपर्यंत’ सर्व वर्णन केले आहे.

सिन्नर पोलीस ठाण्यात एका वादाच्या निमित्ताने खरात आणि आवारेची पहिली भेट झाली होती. त्यावेळी आवारेने माणिकराव कोकाटे यांच्या प्रचाराचे काम केले होते. खरातने कोकाटे २३,४५० मतांनी निवडून येणार आणि त्यानंतर दोन कार्यकर्त्यांचा अपघाती मृत्यू होईल, असे भविष्य वर्तविले होते. ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याचा दावा आवारेने पुस्तकात केला आहे. खरात जे बोलतात ते शंभर टक्के घडते, त्यामुळे ही व्यक्ती ‘सिद्धपुरुष’ असल्याची खात्री पटल्याचे आवारेने नमूद केले होते.

या आत्मचरित्रात खरातच्या शिक्षणाबाबतही मोठे दावे करण्यात आले आहेत. खरातने फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ‘सुवर्ण विद्यापीठातून’ ब्रह्मांड शास्त्र विषयात सुवर्णपदकासह पदवी मिळवल्याचा उल्लेख आहे. तसेच त्याने सैनिकी शिक्षण पूर्ण केल्याचेही म्हटले आहे. परंतु, खरातविषयक हे सर्व दावे खोटे असल्याचे उघड झाले आहे.