नाशिक – महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात कृषी उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या नाशिकमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दीड महिना आधी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर नाशिकमध्ये आले होते. मोहाडी येथे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. तत्कालीन राजकीय घडामोडी लक्षात घेऊन पाटेकर यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना दिलेला सल्ला गुरुवारी त्यांच्या अकस्मात निधनाने पुन्हा चर्चेत आला आहे.

नाशिक येथील या संमेलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मोठा धक्का बसला. अभिनय क्षेत्रात मोठी कारकीर्द घडवणारे नाना पाटेकर हे अखेरपर्यंत मातीशी नाळ जोडून होते. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी प्रचंड काम केले. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्याची भावना उमटत आहे. नाशिकमधील संमेलनात नानांनी केलेले भाषण उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर तरळले.

चार मार्च २०२४ चा तो दिवस होता. देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू होण्याच्या मार्गावर होती. त्याच दिवशी नाशिकमध्ये नाना पाटेकर यांच्या हस्ते शेतकरी संमेलनाचे उद्घाटन झाले होते. यावेळी संमेलनाध्यक्ष भानू काळे, स्वागताध्यक्ष विलास शिंदे, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील, मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शेतकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गंगाधर मुटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला होता. सोन्याचे दर वाढत असल्याचा दाखला देत त्यांनी गहू, तांदळाचा भाव का वाढत नाही, असा प्रश्न केला. देशाला रोज अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांनी अशा दुर्लक्ष करणाऱ्या सरकारकडे आता काही मागू नये. कोणते सरकार सत्तेत आणायचे आणि कोणाला घालवायचे, ही ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी, असा सल्ला त्यांनी दिला होता.

जोपर्यंत शेतकरी आपली जात, धर्म बाजूला ठेवून एकत्र येत नाही, तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या एकजुटीची हीच खरी वेळ आहे. शेतकरी आत्महत्या ही अत्यंत गंभीर व दुर्दैवी गोष्ट आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता आत्महत्येचा मार्ग निवडू नये, असे आवाहन त्यांनी केले. शेतकरी हा अन्नदाता असून त्याने कोणासमोर लाचार न होता, आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती, याकडे उपस्थित शेतकऱ्यांनी लक्ष वेधले.

राजकीय परिस्थितीवर नाराजी

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या होत्या. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली होती. आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू होते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राजकीय घडामोडींवर नाराजी व्यक्त केली होती. महिनाभरात सर्व पक्ष संपलेले असतील. यांना कधी कळणार की मृत्यू येणार, किती तो संचय करायचा, अमर असल्यासारखे काय वागतात, तुम्ही कुठले आदर्श आमच्या पिढीसमोर ठेवत आहात, अशा शब्दांत त्यांनी संतप्त भावना व्यक्त केली होती. राजकारणातील प्रवेशाविषयी त्यांनी टिप्पणी केली होती. मला राजकारणात जाता येत नाही. कारण जे पोटात ते ओठात येते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मला पक्षातून काढतील, असा टोलाही त्यांनी लगावला होता.