नाशिक – मराठी चित्र-नाट्यसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या खणखणीत अभिनयाचे नाणे वाजविणारे अभिनेते नाना पाटेकर यांच्याविषयी त्यांच्याशी जवळचा संबंध असणारे कलाकार, मित्र व्यक्त होत आहेत. नाना पाटेकर हे केवळ एक अभिनेते नव्हते, तर समाजाविषयी संवेदनशीलता जपणारे मनस्वी हळवे व्यक्ती होते, अशीही बाजू यानिमित्ताने पुढे येत आहे. नाना यांच्या मित्रांमध्ये केवळ नाट्य-चित्रसृष्टीतील व्यक्तींचा समावेश राहिला असे नव्हे. प्रसिध्द अधिकारी तुकाराम मुंढे, प्रसिध्द समाजसेवक डाॅ. प्रकाश आमटे यांच्यासारख्या दिग्गजांचाही समावेश राहिला.
मराठमोळ्या कुटुंबातून पुढे आलेल्या नानांनी चित्रपटसृष्टीत स्थिरावण्यासाठी तडजोड अशी केलीच नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्यानंतरही आपल्या नावाचा दरारा निर्माण केला. त्यामुळेच नाना इतर मराठी कलाकारांसाठीही अभिमानाचा विषय झाले. गंभीर, अबोल, विनोदी अशा सर्वच प्रकारच्या भूमिका नानांनी केल्या. प्रत्येक भूमिकेत वेगवेगळे रंग त्यांनी भरले. मित्रांच्या नेहमी उपयोगी पडणाऱ्या नानांनी सामाजिक कार्यातही असेच रंग भरले.
नानांबरोबर ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून समाजकार्य करणारे अभिनेते मकरंद अनासपुरे हे नाना गेल्यानंतर अस्वस्थ झाले आहेत. दुष्काळी भागासाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांसाठी आपण काहीतरी करावयास हवे, या भावनेने नाना पाटेकर झपाटले होते. त्यांना या कार्यात ग्रामीण भागाशी नाळ असलेले मकरंद अनासपुरे यांची साथ मिळाली. त्यातूनच दोघांच्या नावातील पहिल्या आद्याक्षरावरुन ‘नाम फाऊंडेशन’ जन्माला आले. नाम फाउंडेशनने महाराष्ट्रातील दुष्काळी भागात आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना किती आणि कशाप्रकारे मदत केली, हे सर्वश्रृत आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे चांगले मित्र होते. मकरंद अनासपुरे नाना यांना आपले गुरुजी आणि सच्चा दोस्त मानत.
मकरंद अनासपुरे यांनी नाना यांच्या आठवणींविषयी आणि त्यांच्या स्वभावाविषयी माध्यमात भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात नानांनी व्यक्तिश: आपणास कशी मदत केली, हे अनासपुरे यांनी मांडले आहे. नाना समाजाविषयी कायमच संवेदनशील राहत. समाजात घडणाऱ्या काही घटनांमुळे ते अस्वस्थ होत. त्यांना राज्यात ओढावलेल्या दुष्काळी परिस्थितीत अजून कशाप्रकारे कार्य करता येईल, याविषयी निश्चित असे काही करावयाचे होते, परंतु त्यांची इच्छा अपूर्णच राहिल्याचे मकरंद अनासपुरे यांनी म्हटले आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे महाराष्ट्राचे आयुक्त तुकाराम मुंढे हे नाना आणि मकरंद अनासपुरे यांचे जवळचे मित्र. नाना यांच्या जाण्याचा धक्का बसलेले तुकाराम मुंढे हे नाना यांच्या अंत्यविधीलाही उपस्थित होते. दिवाळीनंतर नाना आपली नाशिक येथे जाहीर मुलाखत घेणार होते, असे मुंढे यांनी सांगितल्याचेही मकरंद अनासपुरे यांनी नमूद केले आहे. नाना हे गोव्याला जाण्यापूर्वी काही गोष्टी सांगून गेले होते. यंदा दुष्काळ जास्त दिसतो. त्यामुळे आपण इतरांशी चर्चा करून या परिस्थितीत काही करता येईल काय, ते पाहू, असे नाना यांनी सांगितले होते, अशी आठवणही मकरंद अनासपुरे यांनी मांडली आहे.
