जळगाव : हजूर साहिब नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यानच्या नव्या द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसला भुसावळ आणि चाळीसगाव स्थानकांवर थांबा देण्यात आला असला, तरी खान्देशातील महत्त्वाचे जळगाव जंक्शन स्थानक या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी संघटना आणि नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, जळगाव जंक्शनकडे पुन्हा एकदा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

रेल्वे प्रशासनाकडून उद्घाटन विशेष गाडी क्रमांक ०७६६७ ही ६ जुलै रोजी सकाळी १०.४५ वाजता हजूर साहिब नांदेड येथून रवाना होणार असून, दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे पोहोचणार आहे. या विशेष गाडीला पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

आठवड्यातून दोन दिवस धावणार

दरम्यान, नियमित सेवा म्हणून नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस अकोला–जळगाव–मनमाड मार्गे आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. या गाडीत आरक्षित तसेच अनारक्षित अशा दोन्ही प्रकारच्या प्रवासाची सुविधा उपलब्ध राहणार असल्याने मराठवाडा, खान्देश आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाढती प्रवासी संख्या, सणासुदीच्या काळातील अतिरिक्त गर्दी आणि नव्या रेल्वे सेवेची सातत्याने होत असलेली मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांच्या नाराजीत आणखी वाढ

जळगाव जंक्शनवरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. खान्देशातील जळगावसह धरणगाव, चोपडा, अमळनेर, पाचोरा, एरंडोल तसेच आसपासच्या भागातील नागरिकांसाठी हे प्रमुख रेल्वे केंद्र आहे. असे असतानाही नव्याने सुरू होणाऱ्या गाड्यांमध्ये जळगावला वारंवार डावलले जात असल्याची भावना प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे. अनेक जुन्या रेल्वे गाड्यांनाही जळगाव येथे थांबा नसल्याने यापूर्वीही विविध स्तरांवर निवेदने देण्यात आली होती. आता हजूर साहिब नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यानच्या नव्या गाडीच्या थांब्यांच्या यादीतही जळगावचा समावेश नसल्याने नाराजी आणखी वाढली आहे. मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन आणि प्रवासी संख्येच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या जळगाव स्थानकावर नव्या गाडीला थांबा न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

खासदारांकडून पाठपुराव्याची गरज

या नव्या एक्स्प्रेसचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते ६ जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर नियमित सेवा सुरू होणार असून, मराठवाडा आणि मुंबई दरम्यानच्या रेल्वे संपर्काला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, जळगाव जंक्शनला थांबा न दिल्याच्या निर्णयावरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या गाडीला शक्य तितक्या लवकर जळगाव स्थानकावर अधिकृत थांबा देण्याची मागणी प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी त्यासाठी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त होत आहे.