अकोला : आचारसंहितेमुळे रखडलेल्या दोन रेल्वेगाड्या सुरू होण्याचा अखेर मुहूर्त निघाला आहे. नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस आणि टनकपुर – नांदेड या दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांना ६ जुलैपासून सुरुवात होणार आहे. मराठवाडा, विदर्भातून थेट मुंबई व देवभूमी उत्तराखंडला जोडणाऱ्या थेट गाड्या धावणार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा होणार आहे. 

६ जुलैला उद्घाटन सोहळा 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ६ जुलैला सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळ्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होऊन गाड्यांना हिरवी झेंडी दाखवणार आहेत. हजूर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस उद्घाटन विशेष गाडी क्रमांक ०७६६७ हजूर साहिब नांदेड येथून ७ जुलैला १०.४५ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी ४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण येथे थांबा राहील.

टनकपूर-हजूर साहिब नांदेड विशेष गाडी

टनकपूर-हजूर साहिब नांदेड उद्घाटन विशेष गाडी क्रमांक ०५०१२ टनकपूर येथून ६ जुलैला १़०.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ६ वाजता हजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल. या गाडीला पीलीभीत, इज्जतनगर, बरेली, बदायू, कासगंज, मथुरा, आग्रा कँट, धोलपूर, ग्वालियर, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जं., ललितपूर, बीना, राणी कमलापती, इटारसी, खंडवा, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा येथे थांबा राहणार आहे.

साप्ताहिक एक्स्प्रेसची नियमित सेवा होणार

हजूर साहिब नांदेड-टनकपूर साप्ताहिक एक्स्प्रेसची नियमित सेवा होणार आहे. गाडी क्रमांक १७६३१ दर रविवारी १२ जुलैपासून हजूर साहिब नांदेड येथून २३.४० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०५.५५ वाजता टनकपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक १७६३२ दर मंगळवारी १४ जुलैपासून टनकपूर येथून ९ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.३० वाजता हजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल. या गाडीला पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बीना, ललितपूर, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जं., ग्वालियर, धोलपूर, आग्रा कॅंट, मथुरा, कासगंज, बदायू, बरेली, इज्जतनगर, पीलीभीत येथे थांबा राहील. आठ शयनयान, चार वातानुकूलित ३-टियर, दोन वातानुकूलित २-टियर, एक पँट्रीकार, चार सामान्य श्रेणी, दोन एसएलआर डबे आणि एक जनरेटर कार, अशी गाडीची रचना राहणार आहे.

दोन दशकांपासूनची मागणी पूर्ण

गेल्या २० वर्षांपासून नांदेडवरून अकोला मार्गे मुंबईला थेट गाडीची मागणी होती. आता नांदेड-एलटीटी एक्स्प्रेसमुळे आठवड्यातून दोन दिवस अकोला-मलकापूर मार्गे मुंबईला थेट प्रवास शक्य झाला आहे. टनकपुर-नांदेड साप्ताहिक गाडीमुळे विदर्भ आता उत्तराखंडच्या देवभूमीशी जोडला गेला आहे, अशी माहिती खासदार अनुप धोत्रे यांनी दिली.