नाशिक – नाशिक जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू असल्याने धरणांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही धरणांमधून विसर्ग सुरू असल्याने त्याचा परिणाम स्थानिक पक्ष्यांच्या अधिवासावर होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्राचे ‘भरतपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी तसेच अभयारण्यातील विविध पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी पर्यटक आणि पर्यावरणप्रेमी येथे येऊ लागले आहेत.

महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात विविध प्रकारचे पक्षी, प्राणी आणि समृद्ध वनसंपदा आहे. सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे पाण्याचा प्रवाह वाढत असून पक्ष्यांचे खाद्य, त्यांनी बांधलेली घरटी तसेच त्यांच्या अधिवासाशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टी प्रवाहाबरोबर वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या अधिवासावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

ही शक्यता लक्षात घेऊन वन विभागाने अभयारण्यात विशेष उपाययोजना केल्या आहेत. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यास पक्ष्यांना सुरक्षितपणे थांबता यावे, यासाठी ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह कमी-अधिक प्रमाणात आहे त्या भागात मातीचे मोठे बांध आणि उंच टीले तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी मातीचे मोठे ढिगारेही उभारण्यात आले आहेत. याशिवाय पक्ष्यांना सुरक्षितपणे उतरता व विसावा घेता यावा, यासाठी जहाजाच्या जेटीसारखी संरचनाही उभारण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी दिली.

अभयारण्यात सध्या स्थानिक पक्ष्यांसह काही प्रवासी पक्ष्यांचाही मुक्काम आहे. पाण्याचा निचरा वाढल्यामुळे त्यांचे खाद्यही वाहून जाते. त्यामुळे जलाशयात ठिकठिकाणी मातीचे उंच टीले तयार करण्यात आले आहेत. हे टीले चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले असल्याने कोल्हे, रानमांजरे, कुत्रे किंवा साप यांसारखे भूचर भक्षक तेथे पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे पाणपक्षी या टील्यांवर सुरक्षितपणे एकत्र येऊन विश्रांती घेऊ शकतात.

याशिवाय अभयारण्यात ठिकठिकाणी तळी आणि कृत्रिम जलाशय तयार करण्यात आले आहेत. पक्ष्यांना सुरक्षितपणे उभे राहता यावे, यासाठी धरणपात्रात वाळलेल्या मोठ्या झाडांचे बुंधे आणि फांद्या उभारण्यात आल्या आहेत. सध्या पावसाळ्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असून पर्यावरणप्रेमी अभयारण्यातील समृद्ध जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी येथे येत असल्याचे चौधरी यांनी सांगितले. तसेच शिकारी पक्ष्यांसाठी टेहळणी आणि प्रदेश चिन्हांकनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.