नाशिक – नाशिक जिल्ह्यातील रामसर दर्जा प्राप्त नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पर्यटकांना तसेच पक्षीप्रेमींना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आधुनिक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे आग्रही आहेत. नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या स्थापनेला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, पक्षी अभयारण्य परिसरात ध्वनी मर्यादा काटेकोरपणे लागू केल्या जातील. मोठ्या आवाजातील संगीत, वाहनांचे अनावश्यक हॉर्न व इतर ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवून शांत पर्यावरण सुनिश्चित करण्यात येईल. पक्षी अभयारण्य परिसरात अनधिकृत उत्खननांवर कठोर निर्बंध घालण्यात येणार असून जलाशय आणि किनारी परिसंस्थेच्या रक्षणासाठी सतत निरीक्षण यंत्रणा कार्यरत ठेवली जाईल. पर्यटकांसाठी वैज्ञानिक पद्धतीने नियोजित विशेष दर्शन-बिंदू उभारले जातील.

यामुळे पक्ष्यांचे निरीक्षण सुलभ होईल. मात्र, पक्ष्यांच्या अधिवासाला कोणताही त्रास होणार नाही. पक्षी अभयारण्यात आधुनिक इंटरप्रिटेशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव आहे. थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे पक्ष्यांच्या अचूक प्रतिकृती, स्थलांतर मार्गांचे मॉडेल्स आणि परिसंस्थेची माहिती प्रदर्शित केली जाईल. विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी हे केंद्र ज्ञानाचे महत्त्वपूर्ण साधन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजित पद्धतीने स्मरणिका विक्री केंद्र सुरू करण्यात येईल. स्थानिक हस्तकला आणि पर्यावरणपूरक उत्पादने यांना प्राधान्य दिले जाईल. पक्ष्यांच्या सुरक्षित प्रजननासाठी नेस्टिंग आयलंड्स तयार करणे, आवश्यकतेनुसार झाडांचे पुनर्स्थापन ) करून अधिवास समृद्ध करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पक्षीप्रेमी आणि तज्ज्ञांना एकत्र आणण्यासाठी ‘सोसायटी ऑफ बर्ड कंझर्वेशनिस्ट’ स्थापन करण्यात येईल. अभयारण्याची ओळख अधिक व्यापक करण्यासाठी सर्व प्रमुख राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर माहितीफलक व दिशादर्शक फलक उभारण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

यावेळी नांदूर मध्यमेश्वर @४० या स्मरणिकेचे व माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले तसेच पर्यटकांकरिता वार्षिक पास, पी टी झेड कॅमेरा रूम, चाळीस हजार विद्यार्थ्यांकरिता मोफत प्रवेश अशा विविध योजनांचे उद्घाटन देखील करण्यात आले. खासदार भास्कर भगरे यांनी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याचा विकास करून जागतिक स्तराराचे निसर्गपर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या सूचना केल्या.

आमदार दिलीप बनकर यांनी नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याच्या विकासाकरिता नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे सांगितले. यावेळी उपवनसंरक्षक कृष्णा भवर यांनीही मनोगत व्यक्त केले. विभागीय व्यवस्थापक उमेश वावरे, विभागीय वन अधिकारी गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक हेंमत उबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दत्ता काका उगावकर, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक भरत शिंदे, विभागीय वन अधिकारी यांनी नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी चापडगाव, मांजरगाव, दिंडोरितास, खानगावथडी, शिंगवे, कोठुरे, काथरगाव, करंजगाव, भुसे, नांदूरमध्यमेश्वर, कुरडगांव येथील सरपंच, ग्रामस्थ, वनरक्षक कैलास सदगीर, गोरख पाटील, विद्यार्थी, पक्षी निरीक्षक व पक्षी अभ्यासक, पर्यटक, गाईड , संरक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले. आभार वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी मानले.