नाशिक – जिल्ह्यात थंडीने चांगलाच जोर धरला असतांना नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजले आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर पक्षी पाहण्यासाठी अभयारण्यात येत आहेत. अभयारण्यात सध्या गवताळ आणि झाडांवर आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या ३० हजारापेक्षा अधिक असावी, असा अंदाज पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात दिवाळीनंतर थंडीला सुरुवात होताच देश- विदेशातील पक्षी येण्यास सुरूवात होते. यंदाही दिवाळीनंतर पक्ष्यांचा अधिवास अधिक प्रमाणात वाढला. वन विभागाच्या वतीने पक्ष्यांच्या अधिवासावर लक्ष देण्यात येत आहे.
अभयारण्यात सध्या अलास्कामधून सोनचिखल्या, सैबेरियामधून क्रौच करकोचा, उत्तर कोरियामधून थापट्या, पूर्व सैबेरियातून तरंग, युरेशियन विजन, उत्तर-युरोप आणि पूर्व सैबेरियातून चक्रांग बदक, थापट्या, तलवार बदक, हिमालयमधून नकटा, लडाखमधून चक्रवाक, कजाकिस्तान, तिबेटमधून पट्ट कादंब आणि उत्तर- युरोपमधून लालसरी पक्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून अभयारण्यात आले आहेत. गवताळ आणि झाडांवर आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढली आहे .ही संख्या १५ ते १८ हजार असण्याची शक्यता आहे. पानवेली आणि टायफा काढल्याने पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. याशिवाय अभयारण्य परिसरानजीक गावांमध्येही पक्षी आढळत आहेत. सध्य स्थितीत ३० हजारांहून अधिक पक्षी अभयारण्यात असल्याचा पक्षीतज्ज्ञांचा दावा आहे.
बाहेरगावहून येणाऱ्या पर्यटकांना पक्ष्यांची फारशी माहिती नसल्याने वन विभागाच्या वतीने सात मार्गदर्शकांची (गाईड) व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पक्ष्यांची माहिती देणारे निसर्ग परिचय केंद्र, दुर्बीण आदी व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेरगावहून येणाऱ्या पर्यटकांना निवासासाठी इको हट तसेच विश्रामगृहाची व्यवस्था आहे. नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. याविषयी सहायक वनसंरक्षक हेमंत उबाळे यांनी माहिती दिली. अभयारण्य परिसरात येणाऱ्या पक्ष्यांची माहिती व्हावी, त्यांचे निरीक्षण करता यावे, यासाठी नैसर्गिक वाट (नेचर ट्रेल) तयार करण्यात आला आहे.
संयुक्त वन समितीच्या सहकार्याने पर्यटकांसाठी राहण्याची तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, यासाठी मार्गदर्शनक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. गावाचा विकास व्हावा, याकरिता काही ठिकाणी सौर उर्जेवर चालणारे दिवे, स्वच्छतागृह, पाण्याच्या टाकी, बसण्यासाठी बाकडे आदी व्यवस्था करण्यात आली आहे. गावात ठिकठिकाणी पक्ष्यांसाठी जी फळझाडे उपयुक्त आहेत, त्या झाडांची रोपे ग्रामस्थांना वाटण्यात आली असल्याचे उबाळे यांनी सांगितले.
वन विभागाच्या वतीने पक्ष्यांसाठी आयलँण्ड तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पक्ष्यांना मासे, खेकडे. किडे असे खाद्य मिळू शकते. पाण्यामध्ये उभे राहण्यासाठी तसेच अंडी घालण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. शिकारी पक्षी जे नावाप्रमाणे पक्ष्यांची शिकार करुन पक्षी खातात. तेही अभयारण्यात आले आहेत.
