नाशिक – निसर्गाच्या किमयेचा एक अद्भुत आविष्कार सध्या महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पाहायला मिळत आहे. एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हात, सर्वत्र शुष्कता जाणवत असताना अभयारण्यात ”रोहित” (फ्लेमिंगो) पक्षी दिसत आहेत. हजारो मैलांचा प्रवास करून हे पक्षी अभयारण्यात आले आहेत. त्यांच्या आगमनाने गोदावरी-कादवा नद्यांच्या या संगमावर उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात नेहमी दिसणारे शेकडो पक्षी आहेत. त्यात पोचार्ड हे पाण्याच्या भागात दिसणारे बदक, बगळे, सारस यांचा समावेश आहे. टील्स (छोटे बदक) आणि रोहित हे हिवाळ्यात मोठ्या संख्येने दिसतात. हिवाळ्यात दिसणारे रोहित पक्षी यंदा एप्रिलच्या उत्तरार्धात अवतरल्याने पक्षीप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

२८ एप्रिलपासून रोहित पक्ष्यांचे थवे अभयारण्यात येत आहेत. अभयारण्यातील हिरवाईच्या पार्श्वभूमीवर जलाशयावर उतरणाऱ्या रोहित पक्ष्यांमुळे एक विलोभनीय दृश्य साकारत आहे. निळ्याशार संथ पाण्यावर या पक्ष्यांच्या लांबसडक मानेचे आणि गुलाबी पंखांचे प्रतिबिंब पडल्यामुळे संपूर्ण जलाशय एखाद्या चित्राप्रमाणे भासत आहे.

या पाहुण्यांचा थवा जेव्हा एका लयीत आकाशात झेप घेतो, तेव्हा त्यांच्या पंखांखालील गडद गुलाबी आणि काळा रंग आकाशात रंगांची उधळण करीत असल्याचा भास होतो. नाशिकचे उपवनसंरक्षक (वन्यजीव) कृष्णा भवर यांनी, या विलोभनीय दृश्याचे साक्षीदार व्हा, असे आवाहन पक्षीप्रेमींना केले आहे. पक्षी निरीक्षकांसाठी आणि छायाचित्रकारांसाठी ही एक दुर्मिळ संधी आहे.

या वर्षी अभयारण्यात करण्यात आलेल्या उत्तम अधिवास व्यवस्थापन कामाचे हे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले. नांदूरमध्यमेश्वरचे सहायक वनसंरक्षक हेमंत उबाळे यांनी, उन्हाच्या झळा असूनही पक्ष्यांच्या या थव्याने अभयारण्यातील शांतता आणि सौंदर्य द्विगुणित केले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. पानवेली उच्चाटन करून वेगळी व्यवस्था केल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणावर पक्षी दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

उथळ पाणी, मुबलक खाद्य

कच्छच्या रणातून किंवा सुदूर परदेशातून आलेल्या या पक्ष्यांना नांदूरमध्यमेश्वरमधील उथळ पाणी आणि मुबलक शेवाळमुळे मिळणारे खाद्य त्यांना भुरळ घालत आहे. विशेष म्हणजे, या उन्हाळ्यातही जलाशयाची पाणीपातळी आणि खाद्य या पक्ष्यांसाठी पोषक ठरले आहे.

थवे पाहणे सुखद अनुभूती…

पहाटेच्या वेळी धुक्याच्या वलयातून दिसणारे तसेच सायंकाळच्या मावळत्या सूर्याच्या प्रकाशात न्हाऊन निघणारे रोहित पक्ष्यांचे थवे पाहणे, हा एक सुखद अनुभव ठरत आहे. निसर्गप्रेमींनी या गुलाबी पाहुण्याना बघायला नक्की यावे असे आवाहन नांदूरमध्यमेश्वरचे वान परिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी केले आहे.