नंदुरबार – शहरात समाज माध्यमात प्रसारित होत असलेले कथीत ध्वनिफित (ऑडीओ) प्रकरणाने आता नवे वळण गाठले आहे. एका ध्वनिफितीत भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या विरोधात अनुचित संभाषण करण्यात आल्याने भाजपचे प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय चौधरी यांच्याविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोज बाहेर येणाऱ्या नवनवीन ध्वनिफिती आणि त्यातील कथीत संभाषणाचे जाळे आता थेट मंत्र्यापर्यत पोहचले असून अनेक मंत्र्यांसंदर्भातीलही आक्षेपार्ह संभाषण असलेल्या ध्वनिफिती बाहेर आल्याने नंदुरबारचे राजकीय तसेच सामाजित वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

नंदुरबारमध्ये १५ दिवसांपासून भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्याशी संबंधित ध्वनिफिती बाहेर आल्या आहेत. कधी अधिकारी, कधी पदाधिकारी तर कधी मंत्र्यांबरोबरच्या या संवादाच्या ध्वनिफितींमुळे नंदुरबारच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या सर्व ध्वनिफिती एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने छेडछाड करुन प्रसारित केल्या जात असल्याचा दावा भाजपचे विजय चौधरी यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांच्या मुलाने नंदुरबार पोलिसात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता विजय चौधरी यांची मंत्री जयकुमार रावल, मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबरच्या संवादाच्या कथीत ध्वनिफितीही प्रसारित झाल्या असून त्यातून भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या ध्वनिफितींमधून आमदार डाॅ. विजयकुमार गावित यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यातही डॉ. हिना गावितांबाबत अत्यंत आक्षेपार्ह भाषा असलेली एक कथीत ध्वनिफित प्रसारित झाली आहे. त्यामुळे हिना गावितांचे चुलतभाऊ रोहन गावित यांच्या तक्रारीवरुन भाजपचे विजय चौधरी यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ तसेच अन्य कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. हिना गावित यांच्या कार्यकर्त्यामध्ये या कथीत ध्वनिफितींमुळे रोष असून त्याच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. तसेच विजय़ चौधरींची भाजपमधून हकालपट्टीची मागणी थेट पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी विजय चौधरी यांची प्रतिक्रिया मिळालेली नाही. पोलिसांकडून कथीत ध्वनिफितींच्या तपासणीनंतर सत्यता काय, याची शहानिशा होणार आहे. अशातच मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासंदर्भातही संभाषणाच्या ध्वनिफिती आल्याने जिल्ह्यात भाजपमध्ये आलबेल नसल्याच दिसून येत आहे. या ध्वनिफितींमुळे नंदुरबारचा राजकीय तसेच सामाजिक सलोखा धोक्यात आला असून आता याबाबत थेट वरिष्ठ स्तरावरुन हस्तक्षेप किंवा कारवाईची मागणीची आशा व्यक्त केली जात आहे.