नंदुरबार: गोवंश तस्करीच्या वादातून नंदुरबारमध्ये शनिवारी मध्यरात्री हाणामारी, थेट जमावाच्या अंगावर गाडी घालणे, असे प्रकार घडले. याप्रकरणी चार गुन्हे दाखल झाले असून ११ पेक्षा अधिक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनांमध्ये ५ जण गंभीर तर ४ जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी त्वरीत केलेल्या कार्यवाहीमुळे मोठी घटना टळली.

विसरवाडीहून नंदुरबारकडे गोवंशाची तस्करी करणारे वाहन येत असल्याची माहिती शनिवारी रात्री पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधीत वाहन थांबवून तपासणी केली असता तीन गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत संशयास्पद वाहन बाजूच्या रस्त्यालगत घेवून पोलिसांकडून कारवाई सुरु असतांनाच या वाहनाचा पाठलाग करणारे गोरक्षक आणि गोवंश जनावरांचे वाहन पकडले गेल्याची माहिती मिळाल्याने काही मुस्लीम युवक शिवण नदीच्या पुलाजवळ समोरासमोर आहे. यावेळी दोन्ही गटात हाणामारी झाली. यात दोन युवक जखमी झाले.

या हाणामारीची माहिती काही जणांनी नंदुरबारमधील युवकांना दिली. गोरक्षकांची गाडी नंदुरबारमधील साक्रीनाका परिसरात आल्यानंतर गाडीवर दगड आणि काठ्यांनी हल्ला करण्यात आला. गोरक्षकांची गाडी फोडण्यात आली.. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून दोन्ही गटांना शांत केले. हा प्रकार शांत होवून दोन्ही गट परतत असतांनाच यातील एकाच्या भरधाव गाडीची शहरातील कसाई मोहल्ला परिसरातून जात असलेल्या जमावाला धडक बसली. चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार जणांवर उपचार करुन सोडण्यात आले.

याप्रकरणी पोलिसांनी गोंवश तस्करीचा एक गुन्हा, शिवण नदीवर हाणामारीच्या गुन्ह्यात खुनाचा प्रयत्न करणे, साक्रीनाका परिसरात झालेल्या गाडीवरील हल्ल्यात खुनाचा प्रयत्न करणे, तसेच त्यानंतर भरधाव वेगाने गाडी चालवून अनेकांना जायबंदी करण्याच्या प्रकरणातही खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच रात्री दाखल झालेल्या या चार गुन्ह्यांप्रकरणी पोलिसांनी १० पेक्षा अधिक संशयितांना ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या दरम्यान घडलेल्या या घटनांचे पडसाद शहरात उमटण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी खबरदारी घेतल्याने कुठलाही अनूचित प्रकार घडला नाही.

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांनी शहर शांतता समिती सदस्यांची बैठक घेतली. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला.