नंदुरबार – शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत विविध ठिकाणी तक्रारींचा सूर उमटत असतानाच नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी आपल्या कृतीतून शालेय भोजनाच्या गुणवत्तेबाबत विश्वास निर्माण केला आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीत जाऊन विद्यार्थ्यांसोबत पंक्तीत बसून शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतला.

जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांची मुले शिकत असलेल्या टोकर तलाव येथील जिल्हा परिषद शाळा व शासकीय अंगणवाडीच्या परिसरात हा उपक्रम पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे भोजन स्वतः खाल्ले. विद्यार्थ्यांच्या ताटात भात, शेवग्याचे वरण आणि नाचणीचे बिस्किट असा आहार देण्यात आला होता. शालेय पोषण आहाराबाबत केवळ अधिकाऱ्यांकडून पाहणी न करता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः विद्यार्थ्यांसोबत भोजन करून आहाराची गुणवत्ता आणि चव अनुभवली. त्यामुळे शाळांमधून विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार खाण्यायोग्य आणि गुणवत्तापूर्ण असल्याचा विश्वास निर्माण करण्याचा संदेश त्यांच्या या कृतीतून गेला आहे.

विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी यापूर्वीच आपल्या दोन्ही जुळ्या मुलांना याच शासकीय अंगणवाडीत दाखल करून सरकारी शिक्षण व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे. आता विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा स्वतः आस्वाद घेत त्यांनी आपल्या पाल्यांसह इतर विद्यार्थ्यांनाही सकस आणि चांगला आहार मिळत आहे की नाही, याची प्रत्यक्ष खात्री करून घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीचे उपस्थित शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी तसेच पालकांकडून कौतुक करण्यात आले. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी स्वतः विद्यार्थ्यांसोबत पंक्तीत बसून भोजन घेत असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ‘अधिकारी पाहणी करतात’ यापेक्षा ‘अधिकारी स्वतः खाऊन पाहतात’ हा संदेश या कृतीतून अधिक प्रभावीपणे गेला असून, शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतची संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे.