नंदुरबार – नंदुरबारचे तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या कार्यकाळात जमीन व्यवहाराच्या अनियमित नोंदी प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आठ जणांना निलंबित केले आहे. निवृत्त झालेल्या पाच अधिकाऱ्यांचीही कार्यालयीन चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.
अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे याच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर सहायक महसूल अधिकाऱ्यांपासून ते तलाठींपर्यतच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाईने जमीन घोटाळ्यातील दोषींचे धाबे दणाणले आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या कार्यकाळात शासकीय नोंदी नसतांनाच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनियमित नोंदी करत धनदांडग्यांना लाभ देण्याचा प्रकार घडला होता.
२६ मे २०२५ रोजी तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी रेल्वे स्टेशन रोड येथील शासकीय निवासस्थानी तक्रारीच्या अनुषंगाने छापा टाकला. शासकीय निवासस्थान हे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी झेड. एम. पठाण यांना कोणताही शासकीय अधिकार नसताना या ठिकाणाहुन दोन वर्षांहुन अधिक काळ कामकाज करीत असल्याचे तसेच शासकीय दस्तऐवज विनापरवानगी हाताळत व ताब्यात ठेवत असल्याचे दिसून आले होते.
ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने पठाणविरुद्ध २५ जून २०२५ रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपातील तथ्य पडताळणीसाठी नंदुरबारच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २४ जुलै २०२५ रोजी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. यात अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्यासह तत्कालीन प्रांत अधिकारी अंजली शर्मा. तत्कालीन शहादा आणि नवापूर तहसीलदारांसह दोन नायब तहसीलदारांचा समावेश होता. या चौकशी समितीने आपला अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला.
समितीने यातील दोषींनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बिनशेती आदेश पारीत झालेले नसतांना कार्यालयीन कार्यपध्दतीचा अवलंब न करता तलाठी तसेच मंडळ दप्तरी बेकायदेशीर फेरफार नोंदी घेतल्याची अनियमितता निदर्शनास आल्याचा अहवाल सादर केला.
अहवालानुसार बिनशेती आदेशांची खात्री वा पडताळणी न करता परस्पर आदेश प्राप्त करुन घेवून तलाठी दप्तरी बेकायदेशीर नोंदी घेणे व त्या मंजूर करणे, इत्यादी प्रशासकीय कामकाज जाणीवपूर्वक व हेतुपुरस्करपणे करून शासनाचा महसूल बुडवून आर्थिक नुकसान केल्याचे निदर्शनास आले आहे. या अहवालावरुन शासकीय सेवेत असलेल्या आठ तर शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या चार अधिकाऱ्यांविरुध्द कारवाईचा बडगा उचलण्यात आला.
याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सहायक मंडळ अधिकारी प्रशांत देवरे (मंडळ अधिकारी रनाळे असतांना), हरिष पाटील, सहायक महसूल अधिकारी तळोदा (तलाठी, रनाळे) , शिवाजी यादव, तलाठी उमर्दे (तलाठी चौपाळे असतांना), संजय रनयेवले (तलाठी पातोंडा असतांना), महेश गावित (तलाठी नंदुरबार असतांना), अशोक कोकणी ( तलाठी पातोंडा असतांना) , बाळू धनगर (तलाठी दुधाळे असतांना), जयसिंग पावरा (तलाठी असतांना) यांना निलंबित करण्यात आले आहे.
निवृत्त झालेल्या जे. एम. पठाण, एल. डी. गिरासे , आर. एम. राजपूत ,पी. एस. गावित, अब्दुल माजीद अब्दुल करीम शिकलीकर यांच्यासह वरिल सर्वावर खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्यांपैकी एकाने आम्ही फक्त वरिष्ठांच्या कागदांच्या सहींच्या दस्ताऐवजांच्या आधारे नोंदी केल्याचे सांगितले असून या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे ते म्हणाले.
