नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यात एकीकडे पर्यटन सुविधांची वानवा असताना पर्यटन स्थळांच्या विकासाच्या नावाखाली काम पूर्ण होण्याआधीच लाखो रुपयांंची देयके नियमबाह्य पद्धतीने ठेकेदारांना देण्याचा प्रताप नंदुरबार प्रादेशिक वनविभागाने केला आहे. जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा गैरप्रकार सुरु असताना जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी झोपेचे सोंग घेतल्याचे दिसत आहे.

आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱया नंदुरबारमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक तसेच बाहेरच्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शासन आणि जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून कोट्यवधींच्या योजना वनविभागामार्फत राबविल्या जात असून या योजनांच्या उद्देशाला ठेकेदारांशी संगनमत करुन हरताळ फासण्याचे काम वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केल्याचे उघड झाले आहे. नंदुरबार शहर हद्दीत असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयापुढील दुधाळे शिवारातल्या वनविभागाच्या अख्यतारीतील टेकडीवर “इको पार्क” उभारण्याची संकल्पना तयार करण्यात आली होती.

या इको पार्कसाठी शासनाच्या ‘पर्यटनसाठी वनांचा विकास करणे’, याअंतर्गत जवळपास दोन कोटी चार लाखांच्या निधीचे प्रावधान करण्यात आले होते. या निधीमध्ये या टेकडीच्यां माथ्यावर सपाटीकरण करुन उद्यानाचा पाया तयार करणे, बोअर करणे, पाईप लाईनची तरतूद आणि टाकणी, बांबू उद्यान तसेच सुगंधी वनस्पती बाग निर्मीती करणे, पंप हाऊसचे बांधकाम करणे, जी.एल. पाईपद्वारे नैसर्गिक मार्ग संरक्षित करणे, सुरक्षारक्षक कक्षाचे बांधकाम करणे, गॅझेबॉस बनवणे, कठडे काम करणे, पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळ्या स्वच्छतागृहाचे बांधकाम करणे, तिकीट कक्ष तयार करणे, सेप्टीक टॅक बनवणे, पॅगोडा बनवणे, खेळणी बसविणे आदी १८ कामांचा समावेश करण्यात आला होता.

परंतु, या इको पार्कमधील ही कामे पुर्ण होण्याआधीच वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने नियमबाह्य पद्धतीने ठेकेदारांना ९० ते ९५ टक्के देयके अदा केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कार्यारंभ आदेशात कामाच्या प्रत्येक टप्प्यावर जीओ टॅगचे फोटो आणि व्हिडिओ वनविभागाला सादर करण्याची अट टाकण्यात आली होती. परंतु, या सर्व नियमांना हरताळ फासत वनविभागाने अधिकाऱ्यांना हाताशी धरुन संगनमताने नियमबाह्य पद्दतीने हे सर्व पैसे ठेकेदारांना अदा केल्याचे दिसते.

विशेष म्हणजे, या सर्व कामांचा कार्यारंभ आदेश हे ठेकेदारांना डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात अथवा जानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात देण्यात आले. असे असतानाही ठेकेदारांना अवघ्या दोन ते अडीच महिन्यातच हा इको पार्क पूर्ण झाल्याचे दर्शवित देयके अदा करण्याची कागदोपत्री करामत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी करुन दाखवली. याबाबत नंदुरबारचे वनवरिक्षेत्र अधिकारी एन. एन. वाघ यांनी ही कामे आणि देयक आपल्या कार्याकाळात अदा झाली नसल्याचे सांगत हात झटकले. दुसरीकडे या आधीच्या अधिकारी वर्षा चव्हाण यांना या कामांबाबत विचारणा करण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या लक्षात हा सारा प्रकार आणून दिल्यानंतर संबंझिच अधिकाऱ्यांकडून याबाबतचा अहवाल मागवला असून त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत या कामांबाबत चौकशी करणार असल्याचे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.