नंदुरबार – राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी व फसवी असल्याचा आरोप करुन सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार तालुक्यातील सैताणे येथील शेतकरी प्रमोद पाटील यांनी वेगळाच प्रकार केला. आधी त्यांनी गावातून स्वत:ची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. नंतर, अंत्ययात्रा विहिरीजवळ आल्यानंतर नागरिकांसमक्ष त्यांनी थेट विहिरीत उडी घेतली. ते पाहून सारेच थक्क झाले. नेमका हा प्रकार आहे तरी काय ?

सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी सैताणे गावातील विठ्ठल मंदिर परिसरात गावकरी आणि पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी भजन-कीर्तन करून आंदोलनाला धार्मिक व सामाजिक स्वरूप देण्यात आले. त्यानंतर शेतकरी प्रमोद पाटील यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. पोलिसांनी अंत्ययात्रेला विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या आग्रहामुळे अंत्ययात्रा गावातून फिरविण्यात आली.

अंत्ययात्रा गावातील विहिरीजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे आंदोलन शेतकऱ्यांच्या न्यायासाठी असून आपण आत्महत्या करणार नसल्याचे स्पष्ट करत प्रमोद पाटील यांनी तिरडीवर कपडे काढून थेट विहिरीत उडी घेतली. विहिरीतील पाण्यावर तरंगत त्यांनी जवळपास अर्धा तास आंदोलन केले. यावेळी योगाभ्यासाचे प्रात्यक्षिकही सादर करून त्यांनी आपल्या आंदोलनाकडे लक्ष वेधून घेतले.

घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनावरुन काही वेळ गावकरी, शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.. अखेर पोलीस निरीक्षक आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर प्रमोद पाटील विहिरीबाहेर आले.

विहिरीतून बाहेर आल्यानंतर त्यांनी, आपण आंदोलन मागे घेतलेले नसून, फक्त कर्जमाफीबाबत चर्चा करण्यासाठी बाहेर आलो आहोत, असे सांगितले. सरकारकडून सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याबाबत लेखी आश्वासन न मिळाल्यास पुन्हा विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन सुरू करणार, असा इशारा दिला.

राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना नंदुरबारमधील हे अनोखे आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय ठरले. सैताणेसारख्या छोट्याशा गावातून एका शेतकऱ्याने सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी उभारलेले हे आंदोलन आता केवळ स्थानिक प्रश्न राहिलेला नाही. आंदोलनाला पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध स्तरांतील नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आगामी काळात राज्यव्यापी स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.