नंदुरबार : स्वत:च्या खात्यावर शासकीय धनादेश वटवून ठेकेदारांना पैसे देत वित्तीय अनियमितता करणाऱ्या नवापूरच्या वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांना धुळे प्रादेशिक वनसंरक्षकांनी निलंबित केले. विशेष म्हणजे वनदिनी वनमंत्र्यांच्या हस्ते अवसरमल यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले आहे. वित्तीय अनियमितता सुमारे एक कोटी १३ लाख रुपयांची आहे.
पाच हजार रुपयांपेक्षा अधिक कामांचे ठेकेदारांचे देयक धनादेशाने देण्याचे शासनाचे निर्देश असतांना नवापूरच्या वनक्षेत्रपाल अवसरमल यांनी नवापूर वनक्षेत्र आणि नंदुरबार रोजगार हमी योजनेचा अतिरीक्त कार्यभार सांभाळताना सुमारे एक कोटी १३ लाख रुपये धनादेशाने स्वत:च्या नावावर वटवून घेतले. त्यानंतर रक्कम ठेकेदारांना दिल्याची तक्रार नवापूर वनविभागाच्या माजी रोखपालाने धुळे प्रादेशिक कार्यलयास केली होती. या तक्रारीबाबतच्या तथ्यानंतर धुळे प्रादेशिक वनसंरक्षक निनू सोमराज यांनी तीन समितीय समिती चौकशी स्थापन केली होती.
समितीच्या चौकशीनंतर अवसरमल यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. अनियमितता आणि निष्काळजीपणाबाबत अवसरमल यांच्याकडून समाधानकारक उत्तर प्राप्त न झाल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले. वनसंरक्षक सोमराज यांनी केलेल्या कारवाईचे स्वागत होत आहे. फेब्रुवारीपासून अवसरमल यांची खात्यातंर्गत चौकशी सुरु असताना त्यांची पुरस्कारासाठी शिफारस का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे अधिकार हे शासनाला आहेत. त्यामुळे धुळे प्रादेशिक वनसंरक्षकांनी केलेली कारवाई बेकायदेशीर असून या विरोधात वनमंत्र्यांकडे अपिल केले आहे. याबाबत मॅटमध्ये देखील जाणार असून ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली आहे. – स्नेहल अवसरमल (निलंबित वनक्षेत्र अधिकारी, नवापूर)