नंदुरबार – शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी उत्साहात सुरुवात झाली असून, प्रथम मानाचा गणपती असलेल्या दादा गणपतीचा रथ दोरीने ओढण्यात आला. दादा आणि बाबा गणपतीच्या रथांची होणारी पारंपरिक ‘हरिहर भेट’ हे नंदुरबारच्या गणेशोत्सव मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण मानले जाते.

नंदुरबार शहरातून फिरणाऱ्या दादा गणपतीच्या रथाची ठिकठिकाणी भाविकांकडून पूजा, आरती केली जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, असे साकडे भाविकांकडून गणरायाला घालण्यात येत आहे. रात्री बाराच्या सुमारास दादा आणि बाबा गणपतीची हरिहर भेट होण्याची शक्यता असून, त्याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करण्यापूर्वीपासूनच नंदुरबारमध्ये दादा आणि बाबा गणपतीची सार्वजनिक स्थापना होत असल्याची परंपरा आहे. काळ्या मातीपासून कोणताही साचा न वापरता मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून साकारल्या जाणाऱ्या या मूर्ती नंदुरबारकरांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. गणरायाला निरोप देण्यासाठी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

रथ ओढण्यासाठी माजी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया गावित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती दिसून आली. नंदुरबार गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी हलगीच्या तालावर पारंपरिक पद्धतीने नृत्य केले. नंदुरबारच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रसिद्ध ‘पाच पावली’ नृत्य हे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते.

प्रथम मानाचा दादा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत हिना गावित यांनी आपली बहीण तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्याबरोबर सहभाग घेतला. हलगीच्या तालावर पारंपरिक नृत्य करणाऱ्या दोन्ही बहिणींचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी मिरवणुकीत सहभागी गणेशभक्त आणि कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशे, हलगी आणि ‘पाच पावली’च्या तालावर मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरवणूक हळूहळू मार्गस्थ होत असून ठिकाठिकाणी पूजा केली जात आहे. पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ध्वनिप्रदूषण होणार नाही, यावर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.