नंदुरबार : महाराष्ट्र शासनाच्या अमली पदार्थांविरोधातील ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलिसांनी गांजा तस्करी आणि गांजा लागवडीविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. या मोहिमेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सहा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत पोलिसांनी ९५४ किलोहून अधिक सुका व ओला गांजा जप्त केला. या मुद्देमालाची किंमत सुमारे दोन कोटी ७७ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थांविरोधात ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह धडगाव आणि नवापूर पोलिसांनी स्वतंत्र कारवाया करत गांजाची लागवड करणाऱ्या संशयितांवर कारवाई केली आहे. या कारवायांमध्ये धडगाव तालुक्यात चार ठिकाणी, तर म्हसावद आणि नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एका ठिकाणी कारवाई करण्यात आली. बहुतांश कारवाया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्या आहेत.

शेतशिवारांमध्ये छापे टाकण्यात आले. काही ठिकाणी इतर पिकांच्या आड गांजाची लागवड करण्यात आल्याचे तपासात दिसून आले. पोलिसांनी गांजाची झाडे जप्त करून त्यांची मोजणी व पंचनामा केला. संशयितांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नंदुरबार पोलिसांची अमली पदार्थांविरोधात सर्वात मोठी कारवाई; २ कोटी ७७ लाखांचा ९५४ किलो गांजा हस्तगत. (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

विशेष म्हणजे, चार सप्टेंबरला म्हसावद पोलिसांच्या कारवाईत १६ किलो ५१८ ग्रॅम गांजा, पाच सप्टेंबरला ११३ किलो ८५ ग्रॅम आणि सात सप्टेंबरच्या धडगाव परिसरातील कारवाईत ४४३ किलो गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वीही धडगाव परिसरात गांजाची मोठ्या प्रमाणावर लागवड आढळून आली होती.

या सलग कारवायांमुळे नंदुरबार जिल्ह्यात केवळ गांजाची किरकोळ विक्री किंवा वाहतूकच नव्हे, तर गांजाची लागवड, उत्पादन आणि त्याच्या पुढील पुरवठ्याची साखळी कार्यरत आहे का, याचा तपास आता पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे.

डोंगराळ आणि दुर्गम भागातील शेतशिवारांचा गैरफायदा घेत गांजाची लागवड केली जात असल्याचा संशय या कारवायांमुळे बळावला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता केवळ गांजा जप्त करण्यापुरती कारवाई न करता लागवडीमागील सूत्रधार, आर्थिक व्यवहार, गांजाचा पुरवठा आणि विक्रीची साखळी शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सहा ठिकाणी झालेल्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त झाल्याने नंदुरबारमधील गांजा उत्पादनाचा मुद्दा राज्यस्तरावर चर्चेत आला आहे. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.