नंदुरबार – राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे नेते आणि माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर नंदुरबारचे पालकमंत्रीपद अजूनही रिक्त आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनाचा मान कोणाला मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष असताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना हा मान देण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील पालकमंत्री असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना ध्वजवंदनाचा मान दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत नेहमीच उत्सुकता राहिली आहे. जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकाळात काही वर्षांपासून जिल्ह्यातील मंत्री असतांनादेखील जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांमधील वादामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्रीच नंदुरबारमध्ये पालकमंत्री म्हणून कार्यरत राहणे जिल्ह्यातील नेत्याच्या पसंतीला उतरले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता.

एक, दोन वर्ष डॉ. विजयकुमार गावित वगळता सातत्याने बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्यालाच जिल्ह्यातील पालकमंत्री पदाची जबाबबदारी मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने गिरीश महाजन, त्यानंतर जयकुमार रावल यांनी नंदुरबार जिल्ह्यात भाजपमार्फत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर काही वर्षांपासून जिल्ह्यात एकही आमदार नसलेल्या राष्ट्रवादीला जिल्ह्याच्या पालकत्वाची धुरा देण्यात आली. त्यातच मागील पंचवार्षिकात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री राहिलेले अनिल पाटील यांना नंदुरबारच्या पालकत्वाची जबाबदारी देण्यात आली होती.

त्यानंतर पहिले कृषी आणि नंतर क्रीडामंत्री राहिलेले माणिकराव कोकाटे हे अलीकडेपर्यंत नंदुरबार जिल्ह्याचे पालकत्व सांभाळत होते. माणिकराव कोकाटे यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना बरोबर घेवून जिल्हा विकासासाठी एक आराखडा तयार केला होता. त्यामुळे त्यांच्या कामावर सर्वच आमदार, खासदार देखील खुश असल्याचे पहायला मिळत होते.

राष्ट्रवादीचे मंत्री राहिलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या अल्प कार्यकाळात नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीने दोन नगरपरिषदेवर सत्ता काबीज केली. परंतु, नाशिक सदनिका प्रकरणात मंत्रीपदापासून माणिकराव कोकाटे यांना पायउतार व्हावे लागल्याने दोन महिन्यांपासून नंदुरबारचे पालकमंत्रीपद रिक्त आहे.

अशातच नंदुबारचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवूनच जिल्ह्याचा कारभार पाहतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यातच अजित पवारांकडे पालकमंत्र्याची जबाबदारी असलेल्या पुणे आणि बीड या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणूका आहेत. त्याची आचारसंहिता असल्याने अजित पवार स्वत: नंदुरबार जिल्ह्यातच २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन करतील, अशी शक्यता होती.

परंतु, ध्वजवंदनाला तीन दिवस शिल्लक राहिले असताना राज्याच्या गृह, महसूल आणि ग्रामविकास खात्याच्या राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारे मंत्री योगेश कदम हे नंदुरबार जिल्ह्यात २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन करतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. त्यामुळे मंत्री योगेश कदम यांचे नाव ध्वजवंदनासाठी जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुळातच राष्ट्रवादीच्या कोट्यातील पालकमंत्री पद असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना मंत्र्याच्या हस्ते होत असलेल्या या कार्यक्रमामुळे नंदुरबारचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला जात की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.