नंदुरबार – नंदुरबार तालुक्याच्या पूर्वभागातील शनिमांडळ गावासह परिसराला सोमवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीटीने चांगलेच झोडपले. अर्धातास झालेल्या गारपीटीने परिसरातील कांदा, मका आणि भुईमुगाच्या पिकाला चांगलाच तडाखा बसला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. परिसरातील शनिमांडळ, तिलाली, तलवाडे, इंदरहद्दी या भागात जवळपास अर्धातास मोठ्या आकाराची गारपीट झाल्याचे पहायला मिळाले. अचानक झालेल्या या गारपीटीच्या पावसाने शेतकरी, व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गारपीटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

गारपीटीमुळे या परिसरात लागवड करण्यात आलेला कांदा. मका, भुईमुग सारख्या पिकाला चांगलाच तडाखा बसला. अवघ्या पंधरा दिवसावर काढणीला आलेल्या कांद्याला गारपीटीचा फटका बसल्याने एकरामागे लाख रुपयांचा खर्च करुनही अवकाळीत सापडलेल्या कांद्याला आता कवडीमोल भाव मिळण्याचा धोका आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पीक नुकसानीची मंगळवारी माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी पाहणी केली. त्यांच्या समवेत महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या सरसकट नुकसानीच्या पंचनाम्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. या परिसरात कांदा पिकाची मोठी लागवड होत असल्याने सर्वाधिक फटका हा कांदा पिकाला बसला आहे.

शासन स्तरावर लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करुन शेतकऱ्यांना भरघोस मदत देवून त्यांना आधार देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे यावेळी हिना गावित म्हणाल्या. हिना गावित यांचे वडील डॉ. विजयकुमार गावित या परिसराचे आमदार असून त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रीया झाली असल्याने दोन ते तीन महिन्यापासून ते मुंबईत आहेत. त्यामुळे त्यांच्यावतीने हिना गावितांनी पीक नुकसानीची पाहणी केली.

इंदरहट्टी शिवारातील शेतकरी दीपक राजपूत यांचा दोन एकरवरील कांदा भुईसपाट झाला. काढणीवर आलेल्या कांद्याला गारांचा मार लागल्याने तो सडण्याची भीती आहे. दोन एकरवरील कांदा लागवडीसाठी जवळपास दोन लाखांच्या आसपास त्यांना खर्च आलेला असतांनाच आता त्यांच्या हाती काहीच लागणार नसल्याने ते संकटात सापडले आहेत. सरकारने शेतकऱ्यांना या कठीण परिस्थितीत धीर देण्याची गरज व्यक्त होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात आणखी तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.