नंदुरबार : दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण व्हावे किंवा नाही, हा संबंधितांचा निर्णय आहे. असे नाव न घेता रोहित पवाराना संबोधत मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपण मात्र महायुतीमध्ये होतो. आणि महायुतीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. विलिनीकरणासाठी अटी घालून ऑफर येत असतील तर हे कसे चालेल, असा सवाल करत त्यांनी विलिनीकरणाबाबतचे संकेतही दिले. यापूर्वी अजित पवार यांनीही विलिनीकरणासाठी प्रयत्न केले होते, असा दावा मुश्रीफ यांनी केला.
गोकुळची निवडणूक, राष्ट्रवादीचे विलीनीकरण, अजित पवारांच्या अपघाताचा तपास आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर भाष्य करत नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेवरूनही मुश्रीफ यांनी भूमिका मांडत, अजितदादा असताना जाणीवपूर्वक महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. आणि हा निर्णय सोडण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी सांगितले. गोकुळ दूध संघाची आगामी निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असून, महायुती म्हणूनच ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मोठ्या भावाची भूमिका बजावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरही हसन मुश्रीफ यांनी मोठे विधान केले. या अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातस्थळावरून ब्लॅक बॉक्स मिळाला असून त्यामध्ये संभाषण रेकॉर्ड झाले असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. अजित पवार यांच्या पहिल्या पुण्यतिथीपूर्वी या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाबाबतही मुश्रीफ यांनी भाष्य केले. मंत्री उदय सामंत यांनी जरांगे यांची भेट घेतली असून त्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सणासुदीचे दिवस असल्याने जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही मुश्रीफ यांनी केली.जरांगे हे कोणत्याही विरोधकांच्या भरोशावर आंदोलनाला बसलेले नसून समाजासाठी आंदोलन करत असल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत, असा दावा करत सरकारची भूमिका त्यांनी मांडली.
