नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नवापूर तालुक्यातील रंगावली मध्यम प्रकल्प तुडुंब भरला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आल्याने रंगावली नदीकाठच्या १२ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे नवापूर शहरातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून सातपुड्यातील धडगाव तालुक्यात चांदसैली घाटात दरड कोसळल्याने घाटमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
नवापूर तालुका आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे रंगावली मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. धरणाची पाणीपातळी २२६.२५ मीटरवर पोहोचली असून सांडव्यावरून ५ हजार ४९४.५६ क्युसेक वेगाने रंगावली नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने नदीकाठच्या १२ गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, गुरेढोरे नदीकाठी अथवा नदीपात्रात सोडू नयेत तसेच पूरस्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रंगावली नदीच्या पातळीत वाढ
दरम्यान, रंगावली नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीचा परिणाम नवापूर शहरातील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पुलावर झाला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. नवापूर नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजूंना अडथले उभारून वाहतूक रोखली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, अडथळे हटविण्याचा प्रयत्न करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुलाची तांत्रिक पाहणी आणि सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
यादरम्यान सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात मोठी दरड कोसळली. घाटाच्या तीव्र वळणावर भलीमोठी दरड कोसळल्याने धडगाव तालुक्याला जळगावमार्गे नंदुरबार जिल्ह्याशी जोडणारा महत्त्वाचा घाटमार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली असून अनेक प्रवासी व वाहनचालक रस्त्यात अडकून पडले आहेत.
घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली असून दगडांचा खच हटविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गावर प्रवास टाळावा आणि प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आणखी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नदीकाठच्या तसेच डोंगराळ भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
