नंदुरबार- जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १२३ उद्योजकांनी पाच हजार तीन कोटींचे सामंजस्य करार केले असून यातून जिल्ह्यातील सात हजार ७७८ जणांना रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हा नियेाजन सभागृहात उद्योग गुंतवणूक परिषद झाली. या परिषदेस मंत्री उदय सामंत यांच्या समवेत आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी अनबलगन, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, नाशिक विभाग उद्योग सह आयुक्त वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त (उद्योग व सेवा) निलेश गायकवाड आदी उपस्थित होते.

मागील वर्षी झालेल्या सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीचा दर सुमारे ६३ टक्के असून, ही बाब महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रासाठी समाधानकारक असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.. जमीन अधिग्रहणाच्या वेळी शेतकऱ्यांना विश्वासात घेणे, त्यांना योग्य मोबदला देणे तसेच उद्योग सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. उद्योग आणि स्थानिक नागरिक यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. नंदुरबार जिल्हा गुजरातच्या सीमेलगत असल्याने वस्त्रोद्योगासह विविध उद्योगांसाठी येथे मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.

गुजरातमधील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी नंदुरबारमध्ये गुंतवणुकीसाठी पुढे यावे. आवश्यक सुविधा, प्रोत्साहनपर सवलती व शासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग कटिबद्ध असल्याची ग्वाही सामंत यांनी दिली. गुंतवणूक परिषदेत मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग क्षेत्रात दोन हजार कोटी रुपयांच्या मोठ्या प्रकल्पाचा सामंजस्य करारही करण्यात आला आहे. हे प्रकल्प निर्धारित कालावधीपेक्षा कमी कालावधीत प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्न करावेत. लवकर प्रकल्प उभारणाऱ्या उद्योजकांना शासनाकडून अधिक प्रोत्साहन देण्यात येईल. नवापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गुजरात राज्यातील उद्योजकांनी दाखवलेली अधिकची रुची पहाता याठिकाणी टेक्सटाईल पार्कसाठी वेगळा दर्जा देता येईल का, याबाबत वस्त्रोद्योग मंत्र्यांशी संवाद साधणार अशल्याचे देखील मंत्री उदय सामंत म्हणाले.

नंदुरबारमध्ये बॅकांची आडमुठी भूमिका योग्य नसल्याचे सांगत याबाबत चौकशी करुन दोषी आढळल्यास संबंधीत बॅकांवर कारवाईचे निर्देशही मंत्री सामंत यांनी दिले. भालेर औद्योगिक वसाहतीमध्ये वीज पाणी रस्ते नसतांना जागेचा कब्जा देवून उद्योगाबाबत ५८ उद्योजकांवर करण्यात आलेली कारवाई रद्द करण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली. प्रधान सचिव डॉ.अनबलगन पी. यांनी नंदुरबार हा कृषीप्रधान जिल्हा असून, टेक्सटाईल, केमिकल,मिरची उद्योग आणि अन्य कृषी उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग युनिट्स, विशेष प्रक्रिया केंद्रे तसेच साठवणूक व वेअरहाउसिंग सुविधांना मोठा वाव असल्याचे सांगितले.