नंदुरबार – जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेविषयी आधीच वारंवार तक्रारी येत असताना पुन्हा एकदा एका विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने यंत्रणा हादरली आहे. अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थिनीला उलट्या झाल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली. तिला तातडीने अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था, आश्रमशाळा, विद्यार्थी वसतिगृह, आदिवासी वाड्या-पाड्यांपर्यंत रस्त्यांची वानवा, नद्यांवर पूल नसणे, आरोग्य केंद्रांमधील असुविधा हे प्रश्न कायमच चर्चेत असतात. प्रामुख्याने रस्त्यांअभावी रुग्णाला झोळीतून कधी डोंगर-दऱ्यांमधून तर कधी दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीतून चांगल्या रस्त्यापर्यंत नेण्याची कसरत नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना कायमच करावी लागते. अनेकदा आरोग्य केंद्रात पोहचण्याआधीच रुग्णाचा मृत्यू होणे, गर्भवती रस्त्यातच बाळंत होणे, असे प्रकार घडत असतात.
अशा घटना घडल्यानंतर त्या त्या वेळी बरीच ओरड होते. प्रशासनाकडूनही तातडीने दखल घेतली जाते. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी व्यवस्था करण्याचे दावे केले जातात. परंतु, पुन्हा परिस्थिती पूर्ववत होते. घडलेल्या घटनांविषयी कोणी चकार शब्दही बोलत नाही. नंदुरबार जिल्ह्यात १० दिवसात तीन विद्यार्थिनींची मृत्यू झाल्याने यंत्रणा हादरली आहे. अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत्युचे कारण निश्चित करण्यासाठी मृतदेह विच्छेदनासाठी नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येणार असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मुलीच्या मृत्युची माहिती मिळताच आई-वडील आणि नातेवाईकांनी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी रुग्णालयात दाखल होत परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असलेले कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन मयत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.
