नंदुरबार – जिल्ह्यात सातपुड्याच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये वसलेल्या गावांमधील होळी सणाचा आनंद घेणे म्हणजे एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती असते. सातपुड्यातील काठी संस्थान येथील राजवाडी आदिवासी होळी ही त्यापैकीच एक. ही काठीची राजवाडी होळी तिच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे सर्वदूर प्रसिध्द आहे. या राजवाडी होळी उत्सवासाठी गुजरातमधून आणलेला पवित्र बांबू सोमवारी रात्री काठीत दाखल होणार आहे. चार दिवसांत जवळपास चारशे किलोमीटरचा डोंगर-दऱ्यांतून पायी प्रवास करीत बांबू आणणाऱ्या १२ मानकऱ्यांनी ही परंपरा जपली आहे.

आदिवासी समाजासाठी काठी संस्थानची राजवाडी होळी अत्यंत मानाची व ऐतिहासिक मानली जाते. बाराव्या शतकापासून अखंड सुरू असलेली काठी संस्थानाची राजवाडी होळी देश-विदेशात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांमुळे प्रसिद्ध आहे. आदिवासी संस्कृती, विधी-विधान आणि अनोख्या रितीरिवाजांमुळे हा उत्सव अभ्यासक व पर्यटकांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. होळीसाठी लागणारा बांबू दरवर्षी खास गुजरात राज्यातील जंगलातून आणला जातो, ही या परंपरेची खास वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.

यंदा २६ फेब्रुवारी रोजी बांबू शोधण्यासाठी मानकरी गुजरातकडे रवाना झाले होते. गुजरातमधील नेमगी परिसरातील जंगलात जाऊन सर्वांच्या पसंतीस उतरलेला बांबू निवडण्यात आला. विधीवत पूजा करून कुठल्याही हत्याराचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने तो मुळासकट काढण्यात आला. त्यानंतर डोंगर-दऱ्यांतून पायी प्रवास करत बांबू काठीकडे आणण्यात येत आहे. मार्गातील चापडी आणि मोकस येथे मुक्काम करत विविध गावांमध्ये आदिवासी बांधवांकडून बांबूची पूजा केली जात आहे.

सोमवारी रात्री काठीत आगमनानंतर लिंबाच्या झाडाखाली बांबूची विधीवत पूजा करून त्याला सजविण्यात येणार आहे. मंगळवारी पहाटे मिरवणुकीतून होळीच्या जागी नेऊन पारंपरिक पद्धतीने लाकडांच्या राशीत तो उभा केला जाईल. मंगळवारी पहाटे पाच ते सहा या वेळेत हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत होळी प्रज्वलित केली जाईल. बुध्या, बावा आणि मोरख्या अशा पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधव नृत्यात सहभागी होतील. आणि संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून जाईल. या उत्सवासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उपस्थित राहणार असून प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरणाऱ्या या राजवाडी होळी उत्सवाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. काठीची राजवाडी होळी कशी असते, हे पाहण्यासाठी दूरदुरुन पर्यटक काठी येथे येत असतात. वेगवेगळी वेशभूषाआणि रंगभूषा केलेले आदिवासी बांधव होळीभोवती नाचताना बेभान होतात. याप्रसंगी पारंपरिक वाद्यांचा स्वर संपूर्ण परिसर व्यापून टाकतो. काठीची राजवाडी होळी ही उत्तर महाराष्ट्रातील मानाची होळी समजली जाते. या होळीसाठी आदिवासी बांधव अनेक ठिकाणांहून वाहन व्यवस्था नसली तरी पायीच काठीमध्ये येत असतात.