नंदुरबार – देशविदेशात आपल्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील काठी संस्थानाचा राजवाडी होलिकात्सव मंगळवारी पहाटे मोठ्या उत्साहात साजरा झाला. पारंपरि पद्धतीने वेशभुषा परिधान करुन रात्रभर ढोल ताश्यांच्या गजरात थिरकत हजारो आदिवासी बांधवांच्या साक्षीने काठीची होळी प्रज्वलीत झाली.
भोंगऱ्या बाजारापासुन सुरु झालेल्या होलिकात्सवाची धूम सध्या सातपुडा पर्वत रांगामधील विविध गावागावात पहावयास मिळत आहे. होळीसाठी पारंपरिक बावा, बुध्या, मोरख्या, ढानकोर अशा विविध वेशभुषा परिधान करण्यासाठी खास व्रत पाळले जाते. या काळात खाटेवर न बसणे, जमिनीवर झोपणे, अनवाणी चालणे, ब्रम्हचर्याचे पालन करणे अशा विविध नियमांचे पालन आदिवासी बांधव करतात. हे वेष परिधान केलेले आदिवासी बांधव पाच दिवस स्नान न करता पाच होळींची अशाच पारंपरिक पद्धतीने पूजा करुन आपले होळीचे व्रत पूर्ण करतात.
यंदा काठी येथे होळी मित्ताने मोठा उत्साह आणि जल्लोष पाहण्यास मिळाला. ढोल, बिजरी, घुंगुरुच्या तालावर आदिवासी बांधव काठी येथील होळीमध्ये रात्रभर थिरकले, काठीच्या होळीसाठी यंदा ७० ते ८० फुट लांबीचा बांबु गुजरातच्या नेमगी येथील जंगलातून घेऊन १२ मानकरी चार दिवस ४०० हून अधिक किलोमीटर अंतर पायी कापून सोमवारी मध्यरात्री काठी गावात दाखल झाले. बांबुची पांरपरिक पद्धतीने पूजा करुन त्याला सजवुन मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास काठीच्या होळी ठिकाणी आणण्यात आले.
याआधी रात्रभर या ठिकाणी आलेल्या प्रत्येक आदिवासी बांधवाने आपल्या हाताने दोन मूठ माती कोरत होळीचा खड्डा तयार केला. या खड्ड्यात बांबु ठेवुन होळी उभारण्यात आली. मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास होळी प्रज्वलीत करण्यात आली. यावेळी आदिवासी बांधवांनी एकच जल्लोष करत होळी भोवती पारंपरिक पद्धतीने फेऱ्या मारल्या. हजारो आदिवासी बांधव एकाच वेळी होळीला घेत असलेल्या फेऱ्यांमुळे अदभुत नजारा दिसुन आला. यावेळी होळीचा बांबु पूर्व दिशेला पडला. हा बांबु पूर्वेला पडल्यास आगामी वर्षभरात भरभराटी आणि सुख नांदेल, असा आदिवासी बांधवांचा समज आहे. बांबु इतर दिशेला पडल्यास संकट, महामारी अशा विविध समस्यांना सामारे जावे लागले असते, असा समज आदिवासी बांधवामध्ये आहे.
दा काठीच्या होलिकात्सवात राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उपस्थिती लावत सुविधांचा आढावा घेतला. याठिकाणी येणारे हजारो पर्यटक आणि आदिवासी बांधवांसाठी असलेली तोकडी सुविधा पाहता. आगामी वर्षभरात याठिकाणी आदिवासी विकास विभागातून मुलभूत सुविधा पुरविण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अजून आठ ते दहा दिवस सातपुडा पर्वत रांगामध्ये होळीचा उत्साह कायम राहणार आहे.
