नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील आणि वळणदार असलेल्या कोंडाईबारी घाटात सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. पुण्याहन नवापूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस कोंडाईबारी घाटातील पोलीस चौकीजवळ वाहतूक कोंडीमुळे एका कंटेनरच्या मागे उभी असताना मागून भरधाव वेगात आलेल्या मालमोटारीने बसला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बस कंटेनरवर जाऊन आदळली. आणि अवघ्या काही क्षणांत तिहेरी अपघात घडला.
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, मालमोटारीतील लोखंडी गज थेट बसच्या चालक कक्षात घुसले. त्यामुळे बसच्या चालक कक्षाचा पूर्णतः चक्काचूर झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये पंधराहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. या घटनेने प्रवाशांमध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले. या अपघातात बस चालक महेंद्र लाजा गावित आणि वाहक संतोष बारसू सोंडे हे गंभीर जखमी झाले. चालक त्याच्या कक्षात अडकून पडल्याने त्याची सुटका कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथक यांनी संयुक्तपणे प्रयत्न करुन त्यांना मोठ्या प्रयत्नांनी चालक कक्षातून बाहेर काढले. याशिवाय काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने जवळच्या विसरवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या तिहेरी अपघातात बसची झालेली अवस्था पाहता, या अपघातात केवळ सुदैव म्हणूनच सर्वजण बचावले. हा अपघात अत्यंत जीवघेणा होता. मोठा अनर्थ टळल्याची भावना प्रवासी आणि उपस्थितांकडून व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतर काही काळ कोंडाईबारी घाटातील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.
या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये महेंद्र लाजा गावित (बस चालक, रा. जामनपाडा, ता. नवापूर, नंदुरबार), संतोष बारसू सोंडे (बस वाहक, रा. भुसावळ, जळगाव), योगेश माका पाटील (२८, रा. सुरत), भावना योगेश पाटील (२२, रा. सुरत), भास्कर हरी चित्ते (६४, रा. नवापूर, नंदुरबार), वसंत आनंद वाणी (५५, रा. चिंचपाडा, ता. नवापूर, नंदुरबार), राजेश विनायक पाटील (४५, रा. साक्री, जि. धुळे), उषा मोहन गायकवाड (३५, रा. विसरवाडी, ता. नवापूर, नंदुरबार) यांचा समावेश आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. कोंडाईबारी घाट परिसरात कायम अपघात होत असतात. त्यामुळे वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी या परिसरात व्यवस्था करण्याची गरज आहे. या अपघातामुळे कोंडाईबारी घाट परिसरात वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

