नंदुरबार – राज्यात महायुती म्हणून सत्तेत असलेले भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट नंदुरबार नगरपालिकेत एकमेकांचे विरोधक आहेत. नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधरण सभेत कत्तलखान्याच्या मुद्यावरुन सत्ताधारी शिंदे गट आणि विरोधी भाजप यांच्यात जुंपली. पालिकेच्या अखत्यारीत असलेला बंद कत्तलखाना दुरूस्तीचा प्रस्ताव सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्यावरुन भाजपने सभात्याग केल्यानंतर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. शिंदे गटानेही गोवंश हत्याविरोधात फलकबाजी करुन जोरदार घोषणा दिल्या. विशेष म्हणजे पालिकेतील एमआयएमचे चारही नगरसेवक सत्ताधारी शिंदे गटाला कत्तलखाना दुरुस्तीच्या अनुषंगाने पाठबळ देतांना दिसून आले.

नंदुरबार नगरपालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधरण सभेत कत्तलखाना दुरुस्तीवरुन चांगलाच गोंधळ उडाला. सभेतील विषय क्रमांक ०६ हा पशु कत्तलखान्याच्या दुरुस्तीबाबत ठेवण्यात आलेला होता. याच मुद्यावरुन विरोधी भाजपने आक्रमक पवित्रा घेत या विषयाला जोरदार विरोध केला. मात्र सत्ताधाऱ्यांनी संख्याबळाच्या जोरावर हा विषय मंजुर केल्याने भाजपने सभात्याग केला. यानंतर भाजपने कत्तलखाना सुरु झाल्यास त्याआड गोवंशाची कत्तल सुरु होईल, अशी भीती व्यक्त केली. नंदुरबारमध्ये काही वर्षांपुर्वी याच कत्तलखान्यावरुन जातीय दंगल देखील उसळल्याचे भाजपने आपल्या हरकतीमध्ये नमूद केले. दंगल झाल्यापासूनच हा कत्तलखाना बंद होता. पालिकेतील सभात्यागानंतर भाजपने नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गोंवश हत्येच्या विरोधात फलक झळकवित विरोधात घोषणाबाजी केली.

यानंतर लगेच सत्ताधारी शिंदे गटानेही गोवंश हत्येविरोधात फलक झळकवत गोवंश हत्या चुकीची असल्याचे नमूद केले. कत्तलखाना दुरुस्तीनंतर याठिकाणी म्हशींची कत्तल होणार असल्याचे शिंदे गटाचे नेते आमंदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. त्यांनी पत्रकारांशी संवाद साथला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो कायदा केला, त्यात गोवंश हत्येला बंदी केली आहे. मात्र या कत्तलखान्यात म्हशीची कत्तल केली जाणार असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले. मुळातच न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या निर्देशानुसार हा कत्तलाखाना नसल्याने त्या पद्धतीने त्याची दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली असून याठिकाणी गोवंशाची कुठलीही हत्या होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या म्हशीच्या हत्येला मोदींनी परवानगी दिली, त्याला नंदुरबार नगरपालिकादेखील परवानगी देईल, असे आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले. विरोधी भाजप या मुद्याच्या आडून राजकारण करू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला.

विशेष म्हणजे, सभेत कत्तलखान्याच्या मुद्यावरुन एमआयएमचे नगरसेवक देखील सत्ताधारी शिंदे गटाच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसून आले. त्यानी हा कत्तलखाना गोवंश सोडून इतर जनावरांसाठी सुरू करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले. हा कत्तलखाना सुरू झाल्यास बेकायदेशीर कत्तली रोखल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.