नंदुरबार : येथे आयोजित मिनी सरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन ‘नंदिनी महोत्सव २०२६’ला उत्साहात सुरुवात झाली. हा महोत्सव ग्रामीण महिलांचा आत्मसन्मान, कष्ट आणि उद्योजकतेचे प्रतीक ठरत असल्याचे प्रतिपादन खासदार गोवाल पाडवी यांनी केले.

केंद्र आणि राज्य शासन ‘उमेद मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना नवी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून जिल्हानिहाय सुमारे २० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाणार असल्याची माहिती खासदार गोवाल पाडवी यांनी दिली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर परिसरात उभारलेल्या तंबुत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. १ मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात ८० बचत गटांच्या उत्पादनांचे तसेच २० खाद्यपदार्थांची दालने उभारण्यात आली असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत बचत गटांच्या माध्यमातून आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्ह्याचे सकारात्मक चित्र राज्यात निर्माण केले असून त्यातून नंदुरबारचा नावलौकिक वाढत असल्याचे खासदार पाडवी यांनी नमूद केले. नंदुरबार जिल्ह्यात उमेद अभियान चळवळ बनले असून सुमारे १.९० लाख कुटुंबांपर्यंत त्याचा विस्तार झाला आहे. सध्या १९,७०८ बचत गट, ८६३ ग्रामसंघ आणि ५५ प्रभाग कार्यरत असून बचत गटांना सुमारे ५०० कोटी रुपयांचे बँक लिंकज मिळाले आहे. कर्ज परतफेडीचे प्रमाण ९७ टक्के असल्याचेही सांगण्यात आले.

मोहाच्या लाडूंपासून खाकरा, मध व इतर उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठेत मागणी वाढत असून काही बचत गटांना मोठ्या ऑर्डर मिळाल्याची उदाहरणे यावेळी देण्यात आली. भेसळमुक्त आणि दर्जेदार घरगुती उत्पादनांमुळे महिलांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्याचे मान्यवरांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी बचत गटांसाठी ‘कॅफे कम मार्ट’ उभारण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगत मिलेट आधारित उत्पादनांच्या ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि मार्केटिंगसाठी नव्या योजना राबविण्याची गरज व्यक्त केली. गतवर्षी २५ लाखांची उलाढाल झालेल्या या महोत्सवातून यंदा ५० लाखांची उलाढाल होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.