जळगाव : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खान्देशातील भाविकांना नाशिकपर्यंत सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नंदुरबार–नाशिक रोड दरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे वापरकर्ता सल्लागार समितीचे सदस्य तथा खान्देश प्रवासी असोसिएशनचे प्रतिनिधी प्रतीक जैन (धरणगाव) यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे निवेदन दिले आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान नंदुरबारसह धुळे आणि जळगाव जिल्ह्यांसह संपूर्ण खान्देशातून मोठ्या संख्येने भाविक नाशिकला जाण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता रस्ते वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे हा मोठ्या संख्येने प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी सुरक्षित, सोयीचा आणि तुलनेने किफायतशीर पर्याय ठरू शकतो. दोंडाईचा, शिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाडमार्गे नंदुरबार ते नाशिक रोड दरम्यान विशेष रेल्वे सेवा सुरू झाल्यास नंदुरबारसह धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील भाविकांना मोठा दिलासा मिळू शकतो. या मार्गावर विशेष फेऱ्या वाढविल्यास कुंभमेळ्याच्या कालावधीत प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यास मदत होईल. तसेच खासगी वाहने आणि बस वाहतुकीवरील अतिरिक्त भार कमी होण्यासही हातभार लागू शकतो.
प्रकाशा त्रिवेणी संगमाशी जोडणी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा–प्रकाशा परिसरातील पवित्र त्रिवेणी संगम येथेही सध्या विविध विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात या धार्मिक आणि पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासोबतच प्रकाशा त्रिवेणी संगमाला भेट देणाऱ्या भाविकांसाठीही अधिक चांगली रेल्वे सुविधा उपलब्ध होणे महत्त्वाचे असल्याचे प्रतीक जैन यांच्याकडून निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
फेऱ्या, सेवेचा कालावधी मागणीनुसार
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधी, भाविकांची संभाव्य संख्या आणि खान्देशातून नाशिककडे होणारी वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन नंदुरबार–नाशिक रोड विशेष रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रतीक जैन यांनी निवेदनातून केली आहे. कुंभमेळ्याच्या काळात नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने भाविक नाशिककडे रवाना होण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी आगाऊ रेल्वे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रवाशांची प्रत्यक्ष मागणी, गर्दीचे प्रमाण आणि कुंभमेळ्याच्या विविध पर्वांचा विचार करून या विशेष रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या आणि सेवेचा कालावधी निश्चित करावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
गरजेनुसार अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध करून दिल्यास भाविकांना प्रवासाचे नियोजन करणे सोपे होईल आणि रस्ते वाहतुकीवरील अतिरिक्त ताणही कमी करता येईल. नंदुरबार–नाशिक विशेष रेल्वे सुरू करण्याच्या मागणीचा पश्चिम रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने आणि सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य नियोजन करावे. खान्देशातील भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वेळापत्रक, फेऱ्यांची संख्या आणि आवश्यक त्या अतिरिक्त सुविधांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशीही अपेक्षा जैन यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे सिंहस्थ काळात भाविकांची प्रवासाची गैरसोय कमी होऊन रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
