नंदुरबार – नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात माकडांच्या वाढत्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले आहे. माकडाचा उपद्रव वाढलेला असतांना एका माकडाने थेट कपड्यांच्या दुकानात थेट प्रवेश करत कपड्यांची उलथापालथ केली. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात मागील काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे.

खांडबारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून माकडांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बाजारपेठ, शाळा परिसर आणि रहिवासी भागात माकडांचा मुक्त संचार असून अनेक नागरिकांना माकडांच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. काही जणांना माकडांनी चावा घेतल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खांडबारा येथील बाजारपेठेत असलेल्या एका कपड्यांच्या दुकानात अचानक एक माकड शिरले. त्यावेळी दुकानात ग्राहकांची वर्दळ होती. माकड दुकानात शिरताच ग्राहक आणि दुकानदारांनी घाबरून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. काही काळ दुकानात थांबलेल्या या माकडाने शर्ट-पॅन्टकडे कुतूहलाने पाहणी केली. मात्र काही वस्तू न घेता ते दुकानाबाहेर निघून गेले.

दरम्यान, ही संपूर्ण घटना दुकानातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधित चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसिध्द होत आहे. या घटनेमुळे परिसरात एकिकडे हशा पिकत असला तरी माकडांच्या वाढत्या उपद्रवाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी नवापूर शहरातही अशाच प्रकारे माकडांचा उपद्रव वाढला होता. यावेळी एका शालेय विद्यार्थ्यांवर माकडाने हल्ला केल्याची चित्रफिती समोर आली होती.

त्यावेळी वन विभागाने जळगाव येथील विशेष पथकाच्या मदतीने पिंजरे लावून माकडांना पकडण्याची कारवाई केली होती. त्याच धर्तीवर खांडबारा परिसरातही तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. सद्यस्थितीत या घटनेमुळे माकडांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून वन विभागाने तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.