नंदुरबार – नंदुरबार जिल्हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा आदिवासी विकास मंत्रीपद भूषविणाऱ्या या आदिवासीबहुल जिल्ह्यातील खासदार, आमदार, राजकीय पदाधिकारी श्रीमंत झाले. परंतु, नंदुरबार जिल्ह्यातील विकास मात्र गरीबच राहिला आहे. अजूनही जिल्ह्यात खेडोपाडी पक्के रस्ते, आरोग्य व्यवस्थेची वानवा आहे. परंतु, राजकारणाविषयी आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात वेळ घालविणाऱ्या राजकीय मंडळींना जनतेशी संबंधित विषयांवर लक्ष देण्यास वेळ नाही. नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील परिस्थिती कशी आहे, याचे एक विदारक चित्र अक्कलकुवा तालुक्यात पुन्हा एकदा दिसून आले.

एकिकडे शासन दुर्गम आदिवासी भागाच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करते, तर दुसरीकडे अक्कलकुवा तालुक्यातील वास्तव सत्ताधारी, प्रशासनाच्या दाव्यांना अक्षरशः चपराक देणारे आहे. गावात रस्ता नाही, मोबाईलचे जाळे नाही. आणि त्यामुळे १०८ रुग्णवाहिकेशी संपर्कही नाही. परिणामी प्रसूती वेदना सुरू झालेल्या गर्भवतीला ग्रामस्थांनी चक्क बांबूची झोळी करून पायी उचलून नेले. अक्कलकुवा तालुक्यातील देलबारी, वेहगी परिसरातील बारीपाडा येथील उषा दिनेश तडवी (२८) यांना सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्या. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र गावात मोबाईल नेटवर्कच नसल्याने १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधता आला नाही.

त्यातच गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणार तरी कशी ? गावाच्या मध्यातून देवनदी वाहत असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. अखेर ग्रामस्थांनी बांबूची झोळी तयार केली. आणि झोळीत उषा तडवींना झोपवून पक्क्या रस्त्यापर्यंत नेण्यास सुरुवात केली. परंतु, पक्क्या रस्त्यापर्यंत पोहोचण्याआधीच वाटेत महिलेची प्रसूती झाली. यानंतर महिला आणि नवजात बाळाला वेहगीहून पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर माता आणि बाळाची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही आदिवासी भागातील गर्भवतीला रुग्णालयात जाण्यासाठी बांबूची झोळी आणि ग्रामस्थांच्या खांद्याचा आधार घ्यावा लागत असेल, तर विकास नेमका कोणाचा झाला, असा प्रश्न उपस्थित होतो. आरोग्य सुविधा गावाच्या दारात पोहोचविण्याच्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाने आणि राजकीय मंडळींनी या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. रस्ता, पूल आणि मोबाईल नेटवर्कअभावी एखाद्या रुग्णाचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? दरम्यान, याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून प्रतिक्रिया देणार असल्याचे सांगितले