नंदुरबार – नंदुरबार पोलिसांनी शहरातील एका सायबर कॅफेवर छापा टाकत याठिकाणी सुरु असलेल्या बनावट जन्म-मृत्यु दाखल्याची साखळी उघडकीस आणली. नंदुरबार नगरपरिषदेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागातील एका कंत्राटी कर्मचारी आणि शिपायाला हाताशी धरुन हे बोगस दाखल्यांचे प्रकरण सुरु असल्याचे समाेर आले.

नंदुरबारमध्ये बनावट मृत्यू दाखल्याच्या आधारे एका एलआयसी एजंटने जिवंत व्यक्तींना मयत दाखवून त्याचा दावा पास करुन जवळपास ७० लाखाहून अधिकच्या रकमेचा गैरव्यवहार केल्याचे उदाहरण ताजे असतांनाच आता शहरातील एका सायबर कॅफेमधून बनावट जन्म-मृत्यूचे दाखले दिले जात असल्याचे उघड झाले आहे. नंदुरबार शहर पोलिसांनी शहरातील शास्त्री मार्केट मधील आर.के ऑनलाईन सायबर कॅफेची झडती घेतली. याठिकाणी पोलिसांना बनावट शासकीय शिक्के, बनावट दाखले, लॅपटॉप, प्रिंटर इत्यादी असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी सायबर कॅफेच्या मालकासह एकाला अटक केली. सायबर कॅफे मालक आणि इतर दुसरी व्यक्ती ही नंदुरबार नगरपरिषदेच्या जन्म मृत्यू विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होती. शासनाचे जिर्ण झालेल्या दस्ताऐवजांमधील नोंदी खोट्या पध्दतीने टाकून त्यावर नगरपालिकेच्या बनावट सही शिक्के मारुन त्यावर नगरपालिकेची डिजीटल स्वाक्षरी करुन हे जन्म मृत्युचे दाखल नागरिकांना बनवून दिले जात होते.

याबाबत सखोल चौकशी केल्यानंतर नंदुरबार नगरपरिषदेच्या याच विभागातील एक शिपाई, आणि दोन जणांचा सहभाग आढळून आला. त्यामुळेच याप्रकरणी फिर्यादी युवराज चव्हाण (५६, स्वच्छता निरीक्षक, तथा अतिरिक्त कार्यभार जन्म मृत्यू नोंद विभाग, नंदुरबार नगरपरिषद)र यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आर.के. ऑनलाईन सायबर कॅफे, नंदुरबार तसेच नंदुरबार नगरपरिषद येथील काहींनी संगनमताने बनावट शिक्क्यांचा वापर करत जन्म मृत्यू नोंद व प्रमाणपत्रांमध्ये बनावट नोंदी करुन कागदपत्रे तयार करुन शासनाची तसेच नागरिकांची फसवणूक केली. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार पाच ते सहा वर्षापासून सुरु असल्याचे देखील सांगितले जात आहे. या बनावट जन्म मृत्यु दाखल्या आधारे कोणी काय नोंदी करुन फायदा घेतला, याबाबत छडा लावणे हे पोलीस आणि नंदुरबार नगरपरिषदे सोबतच शासकीय यंत्रणेंसमोर आव्हान असणार आहे.

या प्रकरणात आर. के सायबरचे मालक रिजवान खान सुभान खान, नंदुरबार नगरपरिषदेमधील कंत्राटी कर्मचारी अनिल कोळी, नंदुरबार नगरपरिषदेचे शिपाई लाला ऊर्फ मोहम्मद अली मोहम्मद युसूफ पटेल , शेख शफिक शेख इसाक कुरेशी, आर. के. सायबर कॅफेचा दुसरा मालक इमरान याकूब पिंजारी अशा पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या शासकीय प्रमाणपत्रांसाठी अधिकृत कार्यालये व शासनमान्य केंद्रावरच संपर्क साधावा तसेच नागरिकांना काही संशयास्पद बाबी आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,” असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवणदत्त एस यांनी केले आहे.