नंदुरबार – ज्या जिल्ह्याने आजवर सर्वाधिक सख्येने राज्याला आदिवासी विकास मंत्री दिले, त्या आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यास सुविधा देण्यात मात्र त्यांना अपयश आल्याचे वारंवार सिध्द होत आहे. कधी आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकाच नादुरुस्त, कधी आदिवासी पाड्यापर्यंत जाण्यसााठी रस्ताच नाही, कधी दोन गावांना जोडणारा पूलच नाही, अशा अनेक असुविधांना नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक बिनबोभाटपणे तोंड देत आले आहेत. या असुविधांमुळे आजवर अनेक रुग्णांना रस्त्यातच जीव गमवावा लागला. अशी पार्श्वभूमी असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा असेच एक जीवघेणे प्रकरण घडले आहे.
नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील टाकळी गावाजवळ निझरी नदीवरील पूल अद्याप अपूर्ण असल्याने एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी बांबूच्या झोळीतून नदीपात्र पार करत जीवघेणा प्रवास करावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे दुर्गम भागातील अपुऱ्या पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर संबंधित महिलेला गावातून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. मात्र निझरी नदीवरील पूल अपूर्ण असल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी महिलेला बांबूच्या झोळीतून नदीपात्र ओलांडत दुसऱ्या बाजूला आणले. त्यानंतरही रस्ता अत्यंत खराब आणि ओबडधोबड असल्याने खासगी वाहनाच्या मदतीने तिला रुग्णवाहिका उभी असलेल्या ठिकाणी पोहोचविण्यात आले. तेथून महिलेला तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरू केले. महिलेची सुखरूप प्रसूती झाली असून तिने एका कन्येला जन्म दिला. आई आणि नवजात बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मात्र या घटनेने नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था पुन्हा समोर आली आहे. पूल आणि रस्त्यांची कामे रखडल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची वस्तुस्थिती या घटनेतून अधोरेखित झाली आहे. अशा घटना वारंवार घडूनही मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच संबंधित यंत्रणांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपूर्ण पूल तातडीने पूर्ण करून दुर्गम भागातील रस्ते आणि आरोग्य सुविधा सक्षम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
