नंदुरबार : राज्यात सिंचन सुविधा आणि जलस्रोतांच्या उपलब्धतेबाबत चर्चा होत असताना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पाणीटंचाईचे भीषण वास्तव समोर आले आहे. मामाचे मोहिदे या गाव शिवारातील शेतकरी रमाकांत एकनाथ पाटील यांना पाण्याअभावी आपल्या १२ एकर क्षेत्रातील केळीच्या बागेवर रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ आली. कुपनलिकेतील पाणी आटल्याने उभे पीक वाचवणे अशक्य झाले असून, लाखो रुपयांचा खर्च आणि महिन्यांची मेहनत वाया गेली आहे.
रमाकांत पाटील यांनी आपल्या शेतात केळीची बाग उभी करण्यासाठी लागवड आणि अन्य शेतीकामांवर जवळपास १० लाख रुपये खर्च केले. केळीचे पीक चांगले उत्पन्न देईल, अशी अपेक्षा त्यांना होती. या बागेतून २५ ते ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज होता. मात्र, ऐन पीक वाढीच्या काळात कुपनलिकेतील पाणी आटल्याने संपूर्ण बागेला पुरेसे पाणी देणे शक्य झाले नाही. पाण्याअभावी केळीची झाडे सुकू लागली. आणि हाताशी आलेले पीक डोळ्यांदेखत नष्ट होऊ लागले. अखेर वाढता खर्च आणि पिकाच्या अवस्थेचा विचार करता नाईलाजाने त्यांनी संपूर्ण बाग रोटाव्हेटर फिरवून उदध्वस्त केली.
धरण जवळ, पण सिंचनासाठी पाणी नाही
रमाकांत पाटील यांच्या शेतापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर सारंगखेडा येथील तापी धरण आहे. परिसरात मोठा जलस्रोत उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. धरण जवळ असूनही बागेतील पीक वाचवण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. रमाकांत पाटील यांची शेती सर्वे क्रमांक ४५३ आणि ४५४ मध्ये आहे. शेतीसाठी केलेली गुंतवणूक, घेतलेली मेहनत वाया गेली आहे. आधीच शेतीचा वाढता खर्च, पिकांच्या उत्पादनाबाबतची अनिश्चितता आणि बाजारपेठेतील चढ-उतार यामुळे शेतकरी अडचणीत असताना अशा प्रकारच्या नुकसानीमुळे आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
सिंचनासाठी पाण्याचे नियोजन कधी ?
मामाचे मोहिदे गाव शिवारातील या घटनेमुळे उपलब्ध जलस्रोतांचा सिंचनासाठी प्रभावी वापर करण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांना वेळेवर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कोणत्या उपाययोजना करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. पाणीटंचाईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीची पाहणी करून त्यांना मदत मिळवून देण्याची गरज व्यक्त होत आहे. धरणातील पाणी आणि शेतकऱ्यांच्या शेतातील पाणीटंचाई यातील दरी दूर करण्यासाठी ठोस नियोजन होणार का, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
