नंदुरबार : शहादा तालुक्यातील काथर्दे खुर्द येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जमावासमोर पट्ट थोपटल्याने एका ३५ वर्षीय तरुणावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. पोलिसांत दाखल गुन्ह्यानुसार, गणेश विसर्जन मिरवणुकीत एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जमावाला बघून पट्ट थोपटल्याच्या कारणावरून वाद झाला. यानंतर ईश्वर पवार, गौरीबाई पवार, मनेश पाडवी, अनिल भिल, गुलाब माळी, पावमा ठाकरे, गौरव ठाकरे, साजन वाघ आणि प्रेमराज पाडवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हल्ल्यात मोघ्या भिल (३५) यांना हाताबुक्क्यांनी आणि लाठ्यांनी मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहादा पोलीस करीत आहेत. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत निघाव्यात, यासाठी पोलिसांना काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे. सामाजिक शांततेला बाधा आणणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करावी लागणार आहे.
दरम्यान,दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात १० दिवसात तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने यंत्रणा हादरली आहे. अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत्युचे कारण निश्चित करण्यासाठी मृतदेह विच्छेदनासाठी नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येणार असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मुलीच्या मृत्युची माहिती मिळताच आई-वडील आणि नातेवाईकांनी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.
अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी रुग्णालयात दाखल होत परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असलेले कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन मयत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.
