नंदुरबार : शहादा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या घरुन २०२२ मध्ये चोरीला गेलेल्या शासकीय बंदुकीचा उलगडा झाला आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला अटक केली, त्यांच्याकडून जप्त शस्त्रात शहाद्याच्या पोलीस निरीक्षकाचे चोरीला गेलेले बंदूकही आढळून आले. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहायक पोलीस निरीक्षक भगवान कोळी हे शहादा शहरात वास्तव्यास होते. २०२२ मध्ये सुट्यांमध्ये ते आपल्या कुटुंबासमवेत गावी गेले असता त्यांच्या घरात झालेल्या चोरीत त्यांची शासकीय बंदूकदेखील चोरीस गेली होती. महाराष्ट्र पोलीस तपास करत असतांना तब्बल दोन वर्षांनी ही बंदूक एका संशयिताकडून मध्य प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. महाराष्ट्र -मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील खेतीया पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री एका पेट्रोलपंपाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील सात जणांना ताब्यात घेतले. त्यात दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे. या संशयितांकडून मध्य प्रदेश पोलिसांनी शासकीय बंदुकीसह नऊ लाख ३१ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. हेही वाचा.विधानसभा निवडणुकीत सावरुन घ्या, अजित पवार यांचे जनसन्मान यात्रेत आवाहन या आठपैकी सात संशयित हे महाराष्ट्रातील आहेत. त्यातील नवापूर तालुक्यातील चिंचपाड्याचा रहिवासी असलेल्या रोहित गावित या संशयिताकडे शासकीय बंदूक आढळून आली. दोन वर्षात या संशयितांना या बंदुकीचा नेमका कोणत्या गुन्ह्यामध्ये वापर केला, याचा उलगडा आता होणार आहे.