नंदुरबार – राज्यातील दुर्गम आदिवासी भागांमध्ये आजही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे वास्तव नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा समोर आले आहे. जिल्ह्यातीलउडद्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सादरी परिसरातील पाड्यांवर प्रथमच नर्मदा नदीचे पाणी सोलर पंपाच्या माध्यमातून नळाद्वारे पोहोचल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. या उपक्रमाची राज्यभरात चर्चा होत असून सामाजिक संस्थांच्या पुढाकाराचे कौतुक केले जात आहे.
नर्मदा नदी अगदी हाकेच्या अंतरावर असतानाही डोंगराळ आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे येथे सरकारी यंत्रणांना पोहोचण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे ग्रामस्थांना वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. विशेषतः महिलांना आणि लहान मुलांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेत यंग फाउंडेशन आणि डीजेड फाउंडेशन यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने नर्मदा नदीच्या पात्रातून सोलर पंपाद्वारे पाणी उचलून पाइपलाइनच्या साहाय्याने गावापर्यंत पोहोचवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला. या कामासाठी सात ते आठ किलोमीटरच्या अतिदुर्गम मार्गातून साहित्य वाहून नेण्यात आले. अनेक ठिकाणी रस्ता नसल्याने होडीच्या मदतीने पाइपलाइन आणि साहित्य नदीमार्गे नेण्यात आले.
सुरुवातीला विहीर खोदण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र ग्रामस्थांच्या मदतीने सेवाभावी संस्थांनी हार न मानता सोलर पंप प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित केली. गावात पहिल्यांदाच नळ पाणी सुरू होताच ग्रामस्थांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. अनेक कुटुंबांना प्रथमच घराजवळ स्वच्छ पाणी उपलब्ध झाल्याने महिलांवरील पाण्याचा ताण कमी झाला आहे. डीजेड फाउंडेशनचे दिलीप जैन यांनी दुर्गम भागांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची खंत व्यक्त करत शासनाने अशा भागांकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. सामाजिक संस्थांच्या या उपक्रमामुळे दुर्गम आदिवासी भागांच्या विकासासाठी नवी आशा निर्माण झाली आहे. मुळातच शासनाच्या जलजीवन सारख्या योजनांवर कोट्यवधीचा निधी खर्च होत असतांना आजही सातपुड्याच्या घशाची ताण भागलेली नाही.
या योजना कागदी घोडे नाचवण्यापलीकडे सरकत नसतांना आता शासनाच्या मदतीने एक मोठी योजना या परिसरात तयार करण्याचा विडा देखील जिल्हाधिकारी यांनी उचलला असून याच संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा देखील सुरु आहे. अशातच या सेवाभावी संस्थानी गावकऱ्यांच्या मदतीने जे अशक्या वाटत होते ते करुन दाखविले. नर्मदेचे पाणी थेट पाईपलाईनद्वारे गावपाड्यावर पोहचवून दाखवल्याने गाव करी ते राव काय करी याची प्रचिती आली आहे.
