नाशिक – उत्तर महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित नार-पार-गिरणा जोड प्रकल्पातील ४११६ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या योजनेंतर्गत नार आणि पार नद्यांमधील १०.७६ टीएमसी म्हणजे तब्बल ३०४.६० दशलक्ष घनमीटर पाणी गिरणा नदीत वळविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नऊ धरणे प्रस्तावित असून या पाण्याने नाशिक जिल्ह्यातील चार तर जळगाव जिल्ह्यातील सहा तालुके असे उत्तर महाराष्ट्रातील १० तालुके सुजलाम-सुफलाम होणार आहेत.
महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या नार, पार, औरंगा आणि अंबिका या चार पश्चिमवाहिनी नद्या पश्चिमेकडे वाहत अरबी समुद्राला मिळतात. हे अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अतितुटीच्या गिरणा उपखोऱ्यात आणण्यासाठी नार-पार-गिरणा नदी जोड योजनेची संकल्पना प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांसाठी नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प वरदान मानला जातो.
या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे साडेसात हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यातील कामांची ४११६ कोटींची निविदा जलसंपदा विभागाने डिसेंबर २०२५ अखेरीस काढली होती. या निविदा प्रक्रियेला शासन स्तरावरील समितीने मान्यता दिली आहे. या संदर्भातील कार्यारंभ आदेश जारी होणार असल्याने या प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे.
पाण्याचा लाभ कोणाला, कसा?
या प्रकल्पातून सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचा अंदाज आहे. नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, कळवण, बागलाण आणि देवळा तालुक्यांतील काही भागांना आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, अमळनेर आणि धरणगाव अशा सहा तालुक्यांना मिळणार आहे. प्रकल्पातील काही पाणी स्थानिकांसाठी राखीव असेल. या प्रकल्पातून नाशिक जिल्ह्यातील २५,३१८ हेक्टर, जळगाव जिल्ह्यातील १७,०२४ हेक्टर आणि धरणांच्या परिसरातील ७,१७४ हेक्टर, असे एकूण ४९,५१६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
पहिला, दुसरा टप्पा…
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामात भू-संपादन, पुनर्वसन, प्रकल्पाची रचना अर्थात डिझाइन आणि बांधकाम आदींचा समावेश आहे. या अंतर्गत निश्चित केलेल्या ठिकाणी नऊ धरणे बांधली जातील. धरणांमधून पाणी उचलून ते पूर्वेकडे वाहणाऱ्या गिरणा नदीत सोडले जाईल. हे पाणी धरणे, बोगदे आणि कालव्यांच्या माध्यमातून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात आणले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात धरणे आणि त्यांच्या पायाभूत सुविधांचा अंतर्भाव आहे. दुसऱ्या टप्प्यात कालवा, पाइप वितरण जाळे आणि गिरणा उपखोऱ्यातील चणकापूर धरणात पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक बांधकामाचा समावेश राहील, असे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
