मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांसाठी वरदान ठरणारा आणि गेल्या काही दशकांपासून प्रतीक्षेत असलेला नार–पार–गिरणा नदीजोड प्रकल्प आता प्रत्यक्ष साकारण्याच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत मंजुरी मिळालेल्या गिरणा डावा व उजवा कालवा तसेच मोसमसाळ कालव्याची क्षमतावाढ आणि स्ट्रक्चरल बांधकामाचे भूमिपूजन लवकरच केले जाणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या नियोजनासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून शनिवारी बागलाण तालुक्यातील लखमापूर येथे शेतकऱ्यांची सहविचार सभा पार पडली.

​उत्तर महाराष्ट्रातील गिरणा, मोसम, बोरी आणि कान्होळी नदी खोरे परिसर हा वर्षानुवर्षे दुष्काळी पट्टयात मोडतो. या भागाची पाण्याची तहान भागवण्यासाठी पश्चिम वाहिनी नार–पार–औरंगा नद्यांचे गुजरातमध्ये अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी गिरणा उपखोऱ्यात वळविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.

मंत्री दादा भुसे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. जनभावना आणि भुसे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, ५ सप्टेंबर २०२४ रोजी ७,४६५.२९ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

​ १.२३ लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार

​या प्रकल्पामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होणार आहे. या योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा परिसरातील सुमारे ८१,२३० एकर क्षेत्र ओलिताखाली येईल. तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव व एरंडोल तालुक्यातील ४२,५६० एकर जमीन सिंचनाखाली येईल. अशा प्रकारे दोन्ही जिल्ह्यांतील एकूण १ लाख २३ हजार ७९० एकर क्षेत्राला हक्काचे पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतीसह पिण्याचा आणि उद्योगांचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे.

​ मंत्री भुसे यांच्या कार्यकाळातील ‘मैलाचा दगड’

​नार-पार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १० हजार ६४० दशलक्ष घनफूट पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. त्यासाठी सुरगाणा तालुक्यात होणाऱ्या सुमारे ४,११६ कोटी रुपयांच्या प्रमुख कामांची निविदा प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यात सुमारे २० हजार दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करण्याबाबतचा अभ्यास देखील शासन स्तरावर सुरू आहे. जवळपास १५ तालुक्यांसाठी लाभदायक ठरणारा हा प्रकल्प मंत्री दादा भुसे यांच्या कार्यकाळातील एक मैलाचा दगड ठरणार असून, यामुळे नाशिक व जळगाव जिल्ह्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

​भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी

​प्रकल्पांतर्गत मालेगाव व सटाणा तालुक्यातील कालव्यांची क्षमतावाढ आणि स्ट्रक्चरल बांधकामाच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे. हा भूमिपूजन सोहळा धुमधडाक्यात करण्याचा मंत्री भुसे व त्यांच्या समर्थकांचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने लखमापूर येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कालवे आणि सिंचन व्यवस्थेबाबत शेतकऱ्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. लोकांकडून आलेल्या सूचनांचा आणि भावनांचा आदर करूनच भूमिपूजन सोहळ्याचे व पुढील कामांचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन मंत्री भुसे यांनी यावेळी दिले.