नाशिक – नाशिक जिल्ह्यातील कित्येक वर्षांपासून नार-पार नदी प्रकल्प चर्चेत आहे. काही दिवस या प्रकल्पाची चर्चा थांबते आणि पुन्हा सुरु होते. या प्रकल्पासंदर्भात वेगवेगळ्या मागण्या त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी, नेत्यांकडून होत असतात. यंदा कमी पावसामुळे पुढील काळात भीषण पाणी टंचाई भासण्याची शक्यता असल्याने नार-पार प्रकल्प पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी यासंदर्भात अलीकडेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पाणी स्थितीसह वेगवेगळ्या पाणी योजनांविषयी माहिती दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी एकदरे–वाघाड–करंजवण–ओझरखेड–तिसगाव धरणजोड कालवा योजना कशी गरजेची आहे, ते शेटे यांनी मांडले आहे. दुष्काळी गावांसाठी उचलपाण्यासाठी परवानग्या आणि नार–पार नदीचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या प्रकल्पांना गती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नार-पार नदीचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात आल्यास गोदावरी खोऱ्याला त्याचा मोठा लाभ होणार आहे. एकदरे आणि अन्य वळण योजनांमधून वाघाड धरणात येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा उपयोग करून ते करंजवण, ओझरखेड तसेच तिसगाव धरणांत कालव्याद्वारे वळविण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. असे केल्याने मनमाड, चांदवड, दिंडोरी, वणी, येवला, पिंपळगाव, एचएएल कारखाना परिसरातील पाणीपुरवठा आणि सिंचनाचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. यासाठी तांत्रिक सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, असे साकडे श्रीराम शेटे यांनी घातले आहे.

पार नदीचे अतिरिक्त पाणी अरबी समुद्राला वाहून जात असल्याने हे पाणी वळण योजना आणि उपसा सिंचनाद्वारे मांजरपाडा योजनेला जोडून करंजवण आणि पुणेगाव धरणांत आणण्याच्या पर्यायाचे सर्वेक्षण करावे. पुढे पिंगळवाडी परिसरातून अहिवंतवाडी, भातोडा, धोडप किल्ला, हट्टी, चांदवड, नांदगाव आणि येवला तालुक्यांकडे पाणी पोहोचविण्यासाठी उच्चपातळीच्या कालव्याचा अभ्यास करावा. पार आणि अंबिका – औरंगा नदी खोऱ्यांतील उपलब्ध अतिरिक्त पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविणाऱ्या एकात्मिक नदीजोड प्रकल्पाला गती द्यावी. या योजनांमध्ये दिंडोरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील स्थानिक शेतकऱ्यांच्या पाणी गरजांनाही प्राधान्य द्यावे, असे शेटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

एकदरे धरणातून वाघाडमध्ये उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजांना प्राधान्य द्यावे. जाबुंटके, नाळेगाव, रासेगाव, इंदोरे, मडकीजांब, तळेगाव दिंडोरी, शिवनई, खतवड, ढकांबे, जानोरी आणि वरवंडी आदी दिंडोरी तालुक्यातील दुष्काळी गावांना उचलपाणीसाठी परवानग्या देऊन उपसा सिंचन योजना राबवाव्यात, दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी धरणांसाठी जमिनी दिलेल्या असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य मिळाले पाहिजे, असा आग्रह श्रीराम शेटे यांनी धरला आहे. शेटे यांच्या मागण्यांसंदर्भात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आश्वासन दिले असले तरी त्यावर कार्यवाही कधी होईल, हाच प्रश्न आहे.