धुळे : नरडाणा ते बोरविहीर रेल्वेमार्गाच्या कामाअंतर्गत धुळे तालुक्यातील पिंपरी ते वडजाई दरम्यान उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या जागेवरून निर्माण झालेला वाद मिटल्याचे संकेत आहेत. गावकऱ्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केलेल्या या पुलाची जागा नकाशाच्या आधारे तपासण्यात आली असून, प्रशासकीय मान्यतेनंतर आता नव्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेला पूल हटविण्याची वेळ रेल्वे विभागावर आली.
नरडाणा ते बोरविहीर रेल्वेमार्गासाठी जमीन अधिग्रहणासह विविध कामे सुरू असतांना याच प्रकल्पाचा भाग म्हणून धुळे तालुक्यातील मौजे पिंपरी ते वडजाई रोड शिवारात रेल्वे उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, हा उड्डाणपूल निश्चित करण्यात आलेल्या जागेवर उभारल्यास स्थानिक वाहतुकीच्या दृष्टीने अडचणी निर्माण होतील, अशी भूमिका ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी त्याचवेळी घेतली होती. भौगोलिक परिस्थिती, गावांचा संपर्क मार्ग आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन ये-जा करण्याच्या सुविधांचा विचार न करता पूल उभारला जात असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. पुलाचे काम सुरू होताच पिंपरी, वडजाई, बाभूळवाडी, सौंदाणे आणि नरव्हाळ परिसरातील नागरिकांनी एकजूट दाखवत या कामाला विरोधही केला. सध्याच्या ठिकाणी पूल झाल्यास मूळ रस्त्याची दिशा बदलण्याची शक्यता असून, गावकऱ्यांना नागमोडी वळणाचा मार्ग वापरावा लागेल. तसेच शेतीमालाची वाहतूक, शाळकरी विद्यार्थी, दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. या मार्गाचा वापर परिसरातील अनेक गावांतील नागरिक धुळे शहरात ये-जा करण्यासाठी करतात. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी उभारण्यात येणारा उड्डाणपूल भविष्यात वाहतूक कोंडीचे आणि अपघातांचे कारण ठरू शकतो, असा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला होता.
नरडाणा-बोरविहीर रेल्वेमार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने याबाबत प्रांताधिकारी रोहन कुवर यांना निवेदन देऊन पुलाची जागा बदलण्याची मागणी केली होती. काम त्वरित थांबवावे आणि योग्य ठिकाणी नवीन आराखडा तयार करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मागणी मान्य न झाल्यास चुकीच्या ठिकाणी उभारण्यात येणारा पूल हटविण्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
गावकऱ्यांच्या आक्षेपानंतर रेल्वे विभाग आणि प्रशासनाकडून या प्रस्तावाची नव्याने तपासणी करण्यात आली. उपलब्ध नकाशे, प्रत्यक्ष भौगोलिक स्थिती, रस्त्यांची दिशा आणि स्थानिक गरजा यांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर जुन्या जागेऐवजी अधिक योग्य ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा निघालायची भावना व्यक्त झाली. कारण जुन्या आराखड्यातील त्रुटी दूर करून सुधारित आराखड्यानुसार काम पुढे नेण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे साहजिकच या रेल्वे प्रकल्पालाही गती मिळणार आहे. या प्रकरणात ग्रामस्थांच्या विरोधामुळे प्रशासनाला आराखड्याचा पुनर्विचार करावा लागला आहे. दरम्यान, नवीन जागेवर उड्डाणपूल उभारण्याच्या निर्णयामुळे पिंपरी-वडजाईसह परिसरातील गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पुलामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच स्थानिक रस्ते वाहतुकीची सोय कायम राहणार आहे.
आता सुधारित आराखड्यानुसार प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. रेल्वे विभागाने नागरिकांच्या मागण्यांचा विचार करून घेतलेला हा निर्णय भविष्यातील सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
