Narhari Zirwal : आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकूळ झिरवाळ यांनी मंगळवारी (२३ जुलै रोजी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. इतकंच नाही, तर त्यांनी वडील नरहरी झिरवळ यांनी शरद पवार गटाकडे परत यावं, अशी इच्छादेखील व्यक्त केली होती. त्यानंतर विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं होतं. दरम्यान, या चर्चांवर आता नरहरी झिरवळ यांनी भाष्य केलं आहे. नरहरी झिरवळ आज नाशिकमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना गोकूळ झिरवळ यांच्या शरद पवार गटाच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, “तो माझा मुलगा असून माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, मी त्याची समजून काढण्याचा प्रयत्न करेन, याबाबत मी त्यांना जाबही विचारला आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हेही वाचा - नरहरी झिरवाळ यांचा मुलगा शरद पवार गटाच्या व्यासपीठावर – वडिलांनाही परतण्याची साद नेमकं काय म्हणाले नरहरी झिरवळ? “तुम्ही गोकूळची चिंता करू नका, तो माझा मुलगा आहे. मी त्याचा बाप आहे, तो माझा बाप नाही. तो माझ्या शब्दापुढे जाणार नाही. मी त्याची समजूत काढायचा प्रयत्न करेन”, असं नरहरी झिरवळ म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी आपण अजित पवार गटाबरोबर राहणार असल्याचेही स्पष्ट केलं. “मी काल आज आणि भविष्यात, शेवटपर्यंत अजित पवारांबरोबरच असेल, याबाबत माझ्या मनात कोणतेही दुमत नाही. यासंदर्भात मी गोकुळबरोबर चर्चा करेन”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. “…तर अजित पवार गटाच्या तिकिटावरच निवडणूक लढवेन” यावेळी बोलताना, त्यांनी लोकसभेतील पराभवाबाबतही भाष्य केलं. “यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कुठं कमी पडलो, असं वाटत नाही. स्थानिक उमेदवार असला की त्याला सहानुभूती मिळते, त्याचा अनुभव मला पण आला आहे”, असे ते म्हणाले. तसेच “विधानसभा निवडणूक लढवायचा विषय आल्यास, मी अजित पवार गटाच्या तिकिटावरच निवडणूक लढवेन”, असंही त्यांनी स्पष्ट केली. हेही वाचा - "एकनाथ शिंदेंआधी पहिला प्रयोग माझ्यावर झाला", अनिल देशमुखांचा मोठा दावा; म्हणाले, "तो… गोकूळ झिरवळांनी लावली होती शरद पवार गटाच्या मेळाव्याला हजेरी दरम्यान, नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. या मेळ्याव्याला हजेरी लावत आपण वेगळ्या वाटेवर निघाल्याचे त्यांनी अधोरेखीत केले होतं. विशेष म्हणजे या मेळाव्यात त्यांना व्यासपीठावर बसवण्यात आलं होतं. या मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना, वडील नरहरी झिरवाळ यांनी शरद पवार गटाकडे यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानानंतर नरहरी झिरवळ हे शरद पवार गटाकडे परत येतील का? अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, आता स्वत: नरहरी झिरवळ यांनी यावर भाष्य करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.