नाशिक – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आम्ही पोरके झालो. आमच्या चुका झाल्या असल्या तरी ज्येष्ठ नेते शरद पवार हे आम्हाला पदरात घेतील. पुढील काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, अशी भावना राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर पक्षाच्या वर्तुळातील अस्वस्थता समोर येत आहे. अजित पवार गटाचे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार आहेत. विधानसभेत अजितदादांना नाशिकमधून सर्वाधिक बळ मिळाले. त्यामुळे त्यांनी नाशिकला तीन मंत्रिपदे दिली होती. नाशिकमध्ये अजित पवार गटाचे दिंडोरीत नरहरी झिरवळ, येवल्यात छगन भुजबळ, कळवणमध्ये नितीन पवार, निफाड दिलीप बनकर, सिन्नरमध्ये ॲड. माणिकराव कोकाटे, देवळालीत सरोज अहिरे, इगतपुरीत हिरामण खोसकर हे सात आमदार आहेत. बारामती येथून अंत्यविधीच्या कार्यक्रमातून परतल्यानंतर मंत्री झिरवळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दादांच्या अकस्मात जाण्याने पक्ष दोलायमान झाल्याची भावना प्रगट केली.
अजित दादांची पोकळी कधीही भरून निघणार नाही. परंतु, पक्ष व राज्याचा गाडा चालविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढे आले पाहिजे. दादांची जागा सुनेत्रा पवार यांना द्यायला हवी. सुनेत्रा वहिनींना सर्वानी मार्गदर्शन केल्यास हा गाडा पुढे चालेल. तांत्रिक मुद्यांवर ज्येष्ठ नेते पवार मार्ग काढतील, असे मंत्री झिरवळ यांनी नमूद केले. मुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या दिशेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पावले पडली होती. बैठका झाल्या. अनेक ठिकाणी एकत्रित निवडणूक लढविली. पक्षाचा गाडा चालविण्यासाठी पवार कुटुंबातील कोणीतरी पुढे आले पाहिजे. राजकारण पवार या नावाभोवती फिरते. ज्येष्ठ नेते शरद पवार हे आमच्या काही चुका झाल्या असतील तरी पदरात घेतील, अशी आमची भावना आहे. ते आमच्या सर्वांचा विचार करतील. आम्ही त्यांच्याकडे जाण्याआधी ते आम्हाला बोलावू शकतात. सर्वांनी मनावर घेतले तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जनतेची मागणी पूर्ण होईल, असे मंत्री झिरवळ यांनी सांगितले.
यावेळी आमदार हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर झाले. त्यांनीही आम्ही पोरके झाल्याचे नमूद करीत अजित दादांच्या जाण्याने आम्ही संकटात पडलो. आई-वडिलांनंतर आपण केवळ अजित दादांना मानायचो असे आ. खोसकर यांनी सांगितले.

