नाशिक – आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ३० हजार रुपयांची लाच मागून यातील १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस अमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
सहायक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिरामण शेजवळ (५५, रा. मिलिंद रो-हाऊस, व्हिजन अकॅडमीमागे, जेलरोड, नाशिकरोड) आणि पोलीस अमलदार गणेश मुकुंद कुमावत (३८, कुलस्वामिनी अपार्टमेंट, औटी मळा, सामनगाव रोड) अशी या संशयितांची नावे आहेत. दोघेही शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या दाजीने (जावयाने) १५ जुलै २०२६ रोजी घराशेजारील जंगलातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या बाबत उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या चौकशीसाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ आणि पोलीस अमलदार गणेश कुमावत यांनी तक्रारदाराला उपनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या बिटको चौकीत बोलावले. ‘तुमच्या दाजीने तुमच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असून तुम्हाला ३० हजार रुपये द्यावे लागतील, नाहीतर आम्ही सरकारतर्फे तुमच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करू,’ असे सांगून लाचेची मागणी केली.
या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता सहायक उपनिरीक्षक शेजवळ आणि अमलदार कुमावत यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना संशयितांना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. सहायक पोलीस उपनिरीक्षक शेजवळ आणि पोलीस अमलदार गणेश कुमावत या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांनी जबाबदारी सांभाळली. कारवाई पथकात पोलीस हवालदार संदीप वनवे, योगेश साळवे व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाळदे यांचा समावेश होता.
दरम्यान, शासकीय कार्यालयात कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी झाल्यास अथवा भ्रष्टाचारासंदर्भात काही माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शरणपूर रस्त्यावरील तिबेटीयन भाजीपाला मार्केट येथील कार्यालयात तसेच १०६४ या टोल-फ्री क्रमांकासह ९९३०९९७७००, ९५४५०३१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
