जळगाव : विदर्भातील जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील हतनूर धरणाचे तब्बल १६ दरवाजे एक मीटरने उघडण्याची वेळ नुकतीच आली होती. परिणामी, तापी नदीतील विसर्गही मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र, पाण्याची आवक कमी होताच आता हतनूरचे उघडलेले १४ दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले आहेत. दोनच दरवाजे सध्या अर्धा मीटरने उघडे असून, त्याद्वारे २०४८ क्यूसेकने विसर्ग होत आहे.

जिल्ह्यात जून महिना संपला तरी पावसाला अद्याप कुठेच दमदार सुरूवात झालेली नाही. त्यामुळे सातपुडा पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्या वगळता इतर सर्व नद्या अजूनही खळाळलेल्या नाहीत. असे असताना, विदर्भ तसेच हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होऊन पूर्णा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने तापी नदीवरील हतनूर धरणाची पाणी पातळी वाढली. या धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाला यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा ४६ पैकी १६ दरवाजे एक मीटरने उघडावे लागले. आवक कमी होताच उघडलेले बहुतांश दरवाजे आता बंद करण्यात आले असून, दोनच दरवाजे अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, हतनूरचे उघडलेले १४ दरवाजे बंद करण्यात आल्यानंतर तापी नदीवरील शेळगाव बॅरेजमधील पाण्याची आवकही आता प्रभावित झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बॅरेजचा फक्त एक दरवाजा अर्धा मीटरने उघडा ठेवण्यात आला आहे, ज्या माध्यमातून तापी नदीत १६४७ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यातील दीडशे पेक्षा जास्त गावे आणि चार नगरपालिकांची तहान भागविणाऱ्या गिरणा नदीवरील धरणाचा उपयुक्त पाणीसाठा एक जुलैअखेर ३४.३९ टक्क्यांवर पोहोचला आहे. या दिवसावर गेल्या वर्षी जेमतेम १२ टक्के पाणीसाठा गिरणा धरणात होता. त्या तुलनेत यंदा तब्बल २२ टक्के अधिकचा उपयुक्त पाणीसाठा गिरणा धरणामध्ये निर्माण झाल्याने जिल्ह्यास बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे.