नाशिक – प्रस्तावित सूरत-नाशिक-अहिल्यानगर या महाराष्ट्र-गुजरातला जोडणाऱ्या ग्रीनफिल्ड मार्गातील सूरत-नाशिक टप्प्याविषयी स्पष्टता झालेली नसताना रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने नाशिक-अहिल्यानगर या टप्प्यातील भूसंपादनाचे काम जलदपणे पूर्णत्वास नेण्याची तयारी सुरू केली आहे. नाशिक-अहिल्यानगर दरम्यान आतापर्यंत ३५० हेक्टरची भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम चरणात आहे. या भागातील राहिलेल्या काही जागा संपादित करण्यासाठी हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

सूरत-नाशिक-अहिल्यानगर या प्रस्तावित सहा पदरी राष्ट्रीय मार्गासाठी काही वर्षांपूर्वी भू संपादन प्रक्रिया सुरू झाली होती. या महामार्गातील सूरत-नाशिक या टप्प्याबाबत संदिग्धता निर्माण झाल्यामुळे त्याची भूसंपादन प्रक्रिया मध्यंतरी थंडावली. तुर्तास सूरत-नाशिक मार्गाविषयी अनिश्चितता असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे नाशिक-अहिल्यानगर दरम्यान भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत ३५० हेक्टर जागा संपादनाची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक श्रीकांत ढगे यांनी दिली. एकूण भूसंपादनाच्या हे प्रमाण ८४ टक्के इतके आहे. यासाठी ६०० कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले आहेत. पैसे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्यानंतर या क्षेत्राचा ताबा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येईल. या टप्प्यात जे क्षेत्र राहिले होते, त्यासाठी मंत्रालयाने अधिसूचना प्रसिद्ध केल्याचे ढगे यांनी सांगितले.

प्रस्तावित नाशिक-अहिल्यानगर मार्ग ज्या ओढा, लाखलगाव भागातून जातो, तेथील १२ किलोमीटर लांबीच्या क्षेत्रात संपादित करावयाच्या ७.२९८८१३७ हेक्टरसाठी हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. खासगी क्षेत्रातील ही जमीन आहे. काही पडीक, काही अकृषिक असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. उपरोक्त जागेसंबंधित हितसंबंधितांना नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत प्रस्तावित संपादनाविरुद्ध लेखी स्वरुपात भूसंपादन अधिकारी, नाशिक यांच्याकडे हरकती नोंदविता येतील. त्यावर सक्षम अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होऊन पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

नाशिक-अहिल्यानगर प्रवासासाठी किमान पाच तासांचा अवधी लागतो. प्रस्तावित नाशिक-अहिल्यानगर मार्ग सहापदरी असून तो प्रत्यक्षात आल्यानंतर दोन्ही शहरांतील प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या कमी होईल. तुर्तास हा प्रकल्प मूळ सूरत-नाशिक-अहिल्यानगर नावाने असणार आहे. सूरत-नाशिक टप्प्याचे काम तुर्तास थांबले असले तरी अधिसूचना रद्द करण्याबाबत शासनाकडून कुठलीही स्पष्टता झालेली नाही. तर या मार्गासाठी गुजरातमध्ये भूसंपादन प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर होती, याचीही स्पष्टता झालेली नाही. नाशिक-अहिल्यानगर मार्गाच्या भूसंपादनासाठी ६०० कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले आहे. एकूण संपादनापैकी ८४ टक्के प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात असून उर्वरित १६ टक्के प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे.