नाशिक - मुसळधार पावसामुळे धरणसाठ्यात वाढ होऊन टंचाईचे संकट दूर झाल्याचे चित्र असले तरी नाशिक आणि अहमदनगरकरांना जायकवाडीतील अल्प जलसाठ्याची चिंता भेडसावत आहे. या हंगामात आतापर्यंत दोन्ही जिल्ह्यांतून जवळपास १६ हजार ९०५ म्हणजे १७ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले गेले. पावसाळा संपेपर्यंत जायकवाडी ६५ टक्के न भरल्यास समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार गतवर्षीप्रमाणे नाशिक आणि अहमदनगरमधील धरणांमधून पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. यामुळे सध्या जिल्ह्यातील धरणे भरल्याच्या आनंदापेक्षा जायकवाडी कितपत भरणार, याचा अधिक घोर नाशिक, नगरला लागला आहे. सलग तीन, चार दिवसांतील पावसाने नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरण साठ्यात चांगलीच वाढ झाली. नाशिकमधील लहान-मोठ्या २२ धरणांमध्ये सध्या ४० हजार ४६० दशलक्ष घनफूट म्हणजे ६१.६२ टक्के जलसाठा झाला आहे. धरण परिचालन सूचीनुसार ऑगस्टच्या पूर्वार्धात प्रत्येक धरणात किती जलसाठा करता येईल, हे निश्चित असते. त्यानुसार गंगापूर, दारणासह अन्य धरणांत ८५ टक्क्यांची पातळी राखून उर्वरित पाणी सोडले जात आहे. एक जून ते सहा ऑगस्ट या कालावधीत नाशिकमधून १४ हजार १०१ दशलक्ष घनफूट आणि नगरमधून २८०४ दशलक्ष घनफूट म्हणजे वरच्या भागातील धरणांतून जवळपास १७ टीएमसी पाणी जायकवाडीत गेल्याची पाटबंधारे विभागाची आकडेवारी आहे. मंगळवारी जायकवाडी २०.२७ टक्के भरले. हेही वाच - नाशिक: खड्ड्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू; गुन्हा दाखल करण्याची दशरथ पाटील यांची मागणी पावसाने ओढ दिल्याने प्रारंभी दीड महिने नाशिकमधील धरणे तळ गाठण्याच्या मार्गावर होती. अलीकडेच जलसाठा उंचावण्यास सुरुवात झाली. अजूनही जिल्ह्यातील दोन धरणे कोरडी आहेत. पुढील काळात जायकवाडीच्या जलसाठ्यात सुधारणा न झाल्यास नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समुहातूनही पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. नगर जिल्ह्यात वेगळी स्थिती नाही. तेथील भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा ही धरणे भरली आहेत अथवा भरण्याच्या मार्गावर आहेत. या स्थितीत जायकवाडीसाठी जाणाऱ्या प्रवाहाचे पाटबंधारे विभागाकडून बारकाईने निरीक्षण केले जात आहे. समन्यायी तत्वावर पाणी वाटपाचा निर्णय १५ ऑक्टोबर रोजी असलेला जलसाठा विचारात घेऊन होतो. त्यात एक जुलै ते १५ ऑक्टोबर या कालावधीत सिंचन, बिगरसिंचन वापर लक्षात घेतला जातो. त्यावेळी नदीपात्रातील पाण्याचा स्तर खाली गेलेला असतो. पात्रात कमी पाणी असल्यास धरणांमधून विसर्ग केल्याने अधिक वहनव्यय होतो. जायकवाडीत अपेक्षित पाणी पोहोचत नाही, याकडे अभ्यासक लक्ष वेधतात. जायकवाडीसाठी आतापर्यंत चार वेळा पाणी जायकवाडीची एकूण क्षमता ७६ हजार ६५० दशलक्ष घनफूट म्हणजे ७६.६५ टीएमसी (जिवंत जलसाठा) इतकी आहे. या धरणात ६५ टक्के जलसाठा न झाल्यास वरच्या भागातील (नाशिक व नगर) धरणांमधून पाणी द्यावे लागते. आतापर्यंत २०१२ (शासन आदेशाने), २०१५, २०१८ आणि २०२३ या वर्षात वरच्या भागातून पाणी सोडावे लागले आहे. जायकवाडीतील जलसाठ्याच्या आधारावर गोदावरी खोऱ्यातील समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र आहे. मागील दुष्काळी वर्षात जायकवाडीत अपेक्षित जलसाठा झाला नव्हता. त्यामुळे मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी-दारणा, पालखेड समुहातील २२ धरणांमधून ८.९९ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले होते. हेही वाचा - चांदवड तालुक्यात विजेच्या धक्क्याने दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू जलसाठ्यांची आकडेवारी पाहिल्यावर चिंता वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, ही परिस्थिती ३० सप्टेंबरपर्यंत बदललेली असेल. आता वातावरण बदलले असून पुढील काळात चांगला पाऊस होईल आणि जायकवाडी ६५ टक्के भरेल, अशी आशा आहे. म्हणजे नाशिक, नगरमधून पाणी सोडण्याची वेळ येणार नाही. - उत्तम निर्मळ (निवृत्त कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग)