नाशिक – अखिल भारतीय टेनिस संघटना (आयटा) मानांकन स्पर्धा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि नाशिक जिल्हा टेनिस संघटना (एनडीटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे १४ वर्ष वयोगटातील मुले व मुली यांच्या एकेरी आणि दुहेरी प्रकारात सात दिवसांची राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धा नाशिक जिल्हा टेनिस संघटनेच्या कोर्टवर झाली. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात थरारकता अनुभवण्यास मिळाली. खेळाडूंचा जोष आणि उत्साह पाहण्यासारखा राहिला.
स्पर्धेचे उद्घाटन निवृत्त आयकर उपायुक्त मुराई, बांधकाम व्यावसायिक दीपक पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. पारितोषिक वितरण राज्य टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष राजीव देशपांडे आणि नाशिक जिल्हा टेनिस संघटनेचे अध्यक्ष अद्वैत आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्पर्धा निरीक्षक आणि चीफ रेफ्री प्रणव वाघमारे यांचा सत्कार संघटना सचिव डॉ. संजय पिंचा यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर समीर कपूर, डॉ. विवेक कोठावदे, एकनाथ किणीकर , राकेश पाटील आदी उपस्थित होते.
मुलींच्या एकेरी अंतिम सामन्यात पुण्याच्या बिगर मानांकित भव्या सोनकर हिने प्रथम मानांकित मुंबईच्या आयरा अग्रवाल हिचा ६-४,६-४ असा सरळ सेटमधे धूळ चारत विजेतेपद मिळवत सर्वांना चकित केले. अग्रवालने सामन्यात परत येण्याचे प्रयत्न केले. परंतु त्यास तिला यश आले नाही.
मुलांच्या गटात आरिष दळवी (नाशिक) या प्रथम मानांकिताने अंतिम फेरी आरामात गाठली. परंतु अंतिम सामन्यात पाचव्या मानांकित अर्णव बेळेने (पुणे) आरिषला कडवे आव्हान दिले. परंतु दोन तासाहून अधिक लांबलेल्या सामन्यात अंतिम सेट मधे ६- ४ अशा स्कोरवर विजय प्राप्त केला. अर्णवला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. या सामन्यात आरिषने आपल्या अनुभवाच्या जोरावर फोरहँडचा अचूक वापर करत सामना खिशात घातला. दुहेरीत आपला सहकारी क्रिश सरोजच्या (मुंबई) साथीने अंतिम फेरी गाठली.
द्वितीय मानांकित हर्ष नागवाणी-आरव बेळे (पुणे) जोडीने अतिशय तुल्यबळ लढत दिली. सामना ४-६ ,६- ३, १३- ११ असा जिंकला. निर्णायक तिसरा सेट जो सुपर टायब्रेक पद्धतीने खेळवला गेला. हर्षने आपल्या आक्रमक ड्राइव्ह व व्हॉलीचा वापर करत सामना १३ -११ असा संपवला. मुलींच्या दुहेरी अंतिम सामन्यात प्रथम मानांकित अईरा अग्रवाल- युक्ता मेहता (मुंबई) यांनी बिगर मानांकित इशिता पाटील-भव्या सोनकर (पुणे) यांना फारसा वाव न देता पहिला सेट आरामात ६-३ असा जिंकला.
दुसऱ्या सेटमधे इशिता-भव्याने सामन्यात परतण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत ६- ६ अशी बरोबरी करत प्रथम मानांकित जोडीस तंग केले. परंतु अईरा- युक्ता यांनी आपआपसातील समन्वय राखत दुसरा सेट ७-६ जिंकत दुहेरी गटाचे विजेतेपद प्राप्त केले. विजेत्या खेळाडूंना महत्वाचे राष्ट्रीय मानांकन गुण प्राप्त झाले. ज्याचा उपयोग त्यांचे मानांकन सुधारण्यासाठी होतो. या स्पर्धेमधे महाराष्ट्रातील अधिकाधिक खेळाडूंचा सहभाग होता.
