नाशिक : महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत डाव्या आघाडीची एकजूट भक्कम करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावयास हवेत, अशी अपेक्षा आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.येथे आयोजित भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य अधिवेशनात दुसऱ्या दिवशी डाव्या आघाडीतील इतर पक्षांचे पदाधिकारीही उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी भाकपच्या अधिवेशनाला शुभेच्छा देतानाच आघाडी मजबूत करण्याचा निर्धार केला.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी भाकप हा आमचा मोठा भाऊ असल्याचे आम्ही समजतत असल्याने कायम भाकपशी चर्चा करूनच भूमिका ठरवत असतो, अशी भावना व्यक्त केली. डाव्या आघाडीची एकजूट हाच वर्तमान परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी एकमेव पर्याय आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात आपण मागे पडलो आहोत. आज महाराष्ट्रात विरोधी पक्ष जिवंत राहील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्यासारख्या कष्टकऱ्यांच्या पक्षावर मोठी जबाबदारी आली आहे, तरुणांना आपण आघाडीत सामील करून घेतले पाहिजे, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी, भारताची विमानतळे इराणविरोधातील युद्धासाठी वापरण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप केला. जनसुरक्षा विधेयकाचा मोठा धोका आहे. हिंदीची सक्ती करून सांस्कृतिक दहशतवाद आणला जात असून ही आव्हाने पेलण्यासाठी डावी आणि मानवतावादी आघाडी मजबूत करूया, असे आवाहन केले. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोर ढमाले यांनी, आपण विधानसभेत किती आहोत यापेक्षा रस्त्यावर किती माणसे उतरवू शकतो हे महत्वाचे आहे, या गोविंद पानसरे यांच्या विधानाची आठवण करून देत डावी आघाडी मजबूत करण्याची गरज मांडली. लाल निशाण पक्षाचे (लेनिनवादी) सरचिटणीस भीमराव बनसोड यांनी, आंतरराष्ट्रीय युध्दजन्य परिस्थितीत शांततेसाठी जनमत एकत्रित करण्याची जबाबदारी डाव्या आघाडीवर असल्याचे मत मांडले. उदय भट यांनी शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज मांडली.